
राज्यभरात आज दहीहंडीचा उत्साह पाहायला मिळत आहे. मुंबईसह ठाणे, घाटकोपर आणि राज्यातील विविध भागांत दहीहंडी उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा केला जात आहे. ठिकठिकाणी भव्य दहीहंड्यांचे आयोजन करण्यात आले असून, गोविंदा पथकांना आकर्षित करण्यासाठी लाखो रुपयांच्या बक्षिसांची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे दहीहंडी फोडण्यासाठी गोविंदा पथकांमध्ये चांगलीच चुरस रंगली आहे.
दहीहंडीच्या निमित्ताने विविध ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रमांसोबतच मनोरंजनाचेही खास आयोजन करण्यात आलं. सेलिब्रिटींच्या उपस्थितीमुळे या उत्सवाची रंगत आणखी वाढली आहे. घाटकोपरमध्ये राम कदम यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या दहीहंडी उत्सवात प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटीलने विशेष उपस्थिती लावली.
गौतमी पाटीलच्या उपस्थितीची माहिती मिळताच कार्यक्रमस्थळी तरुणाईची मोठी गर्दी पाहायला मिळाली. गोविंदा पथकांकडून दहीहंडी फोडण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू असतानाच गौतमीच्या नृत्याने वातावरणात आणखी उत्साह संचारला.
गौतमीने स्टेजवर येताच उपस्थित तरुणाईने जल्लोष केला. तिच्या डान्सला सुरुवात होताच प्रेक्षकांनीही ताल धरला. ‘हवाहवाई’, ‘यम्मा यम्मा’, ‘मैं निकला गड्डी लेके’, ‘चांदी की डालपर सोने का मोर ’यांसारख्या लोकप्रिय गाण्यांवर गौतमीने दमदार नृत्य सादर केलं.
गौतमीच्या प्रत्येक स्टेपवर उपस्थितांकडून टाळ्या आणि शिट्ट्यांचा कडकडाट पाहायला मिळाला.
गौतमीच्या डान्सने कार्यक्रमस्थळावरील वातावरण अक्षरशः दणाणून गेलं. तरुणाई तिच्या तालावर थिरकत असताना गोविंदांचाही उत्साह वाढला. त्यामुळे दहीहंडीचा थरार आणि गौतमीचा डान्स असा दुहेरी जल्लोष घाटकोपरमध्ये पाहायला मिळाला.
नृत्यानंतर गौतमीने स्टेजवरून खाली उतरत प्रेक्षकांची भेट घेतली आणि त्यांना अभिवादन केले. तिच्या या खास अंदाजामुळे उपस्थितांमध्ये आणखी उत्साह पाहायला मिळाला. गौतमी पाटीलच्या दमदार परफॉर्मन्समुळे घाटकोपरमधील दहीहंडी उत्सवाला रंगत आली आणि तिच्या नृत्याची चांगलीच चर्चा रंगली.






Leave a Reply