
Manoj Jarange Patil Protest : मनोज जरांगे यांनी उभा केलेला मराठा आरक्षणाचा लढा चांगलाच पेटला आहे. जरांगे यांनी येत्या मंगळवारपासून मुंबईला कूच करण्यास सुरुवात होईल, अशी घोषणा केली आहे. विशेष म्हणजे गणपती बाप्पाचं आगमन सोमवारी आहे. असे असताना मंगळवारीच जरांगे मुंबईच्या दिशेनं रवाना होतील. म्हणजेच ऐन गणपतीतच जरांगे आंदोलकांना घेऊन मुंबईत येणार आहेत. त्यामुळे आता नेमकं काय होणार? सरकार काही तोडगा काढणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
जरांगे यांचा मुक्काम नेमका कुठे असेल?
जालन्याच्या अंतरवाली सराटीपासून ते मुंबईतलं आझाद मैदान असा 4 दिवसांचा जरांगे यांचा प्रवास असणार आहे. त्यांचा 15 सप्टेंबरला पहिला मुक्काम पाटोद्यात असेल. 16 सप्टेंबरला श्रीगोंद्यात आंदोलक थांबतील. 17 सप्टेंबरला पुण्याच्या हडपसरमध्येही एक मुक्काम असेल. त्यानंतर जरांगे आणि मराठा आंदोलक 18 सप्टेंबरला खोपोली येथे रात्रीची विश्रांती घेतील. 19 सप्टेंबर रोजी मुंबईत दाखल होऊन जरांगे उपोषणाला सुरुवात करतील.
जरांगे यांनी आतापर्यंत कोणत्या मागण्या मान्य करून घेतल्या?
दुसरीकडे जरांगे यांच्या आझाद मैदानातील आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी दिलेली नाही. मुंबई हायकोर्टाने जरांगेंच्या आंदोलनाला रोखता येऊ शकतं. परवानगी शिवाय आंदोलन करता येणार नाही, हे स्पष्ट केलेलं आहे. जरांगेंचं सध्याचं 11 वं उपोषण आहे. उपोषणाच्या माध्यमातून जरांगे यांनी सरकारकडून अनेक मागण्या मान्य करून घेतल्या आहेत. जुन्या महसुली आणि कुणबी नोंदी शोधण्यासाठी अॅड. संदीप शिंदे यांची समिती स्थापन करण्याचा जीआर निघालेला आहे. संदीप शिंदे समितीने आतापर्यंतच्या 58 लाख कुणबी नोंदी शोधल्या आहेत. मराठवाड्यासाठी हैदराबाद गॅझेट लागू करुन निझामकालीन कुणबी नोंदी शोधण्यात आल्या आहेत. कुणबी नोंदीवरुन मराठवाड्यात 3 लाख 16 हजार 977 जातप्रमाणपत्राचं वाटप झालेला आहे. SEBC अंतर्गत मराठा समाजाला 10 % स्वतंत्र आरक्षण देण्यात आलं. मराठवाड्यात 2 लाख 95 हजार 305 SEBCप्रमाणपत्रांचं वाटप झालंय.
तर 10 मिनिटांत महाराष्ट्र बंद करू
जरांगे यांच्या आणखी काही मागण्या आहेत. 58 लाख कुणबी नोंदींवरुन 58 लाख जातप्रमाणपत्र द्या. जात वैधता समितीने रद्द केलेल्या 4 लोकप्रतिनिधींचे कुणबी जातप्रमाणपत्र वैध करा. हैदराबाद गॅझेटप्रमाणे, सातारा कोल्हापूर इतर संस्थानांचे गॅझेट लागू करण्याचा जीआर काढा, अशा नव्या मागण्या जरांगे यांनी केलेल्या आहे. याच मागण्यांना घेऊन जरांगे यांनी चलो मुंबईचा इशारा दिला आहे. मुंबईत येण्यापासून रोखताना जर सरकारनं लाठीचार्ज केला आणि एकाही आंदोलकाचं रक्त साडलं तर 10 मिनिटांत महाराष्ट्र बंद करू, असं जरांगे म्हणालेले आहेत. दरम्यान जरांगेंनी मुंबईतील आंदोलनाची दिशा स्पष्ट केली आहे. त्यामुळं अजून 3 दिवस सरकारकडे आहेत. या 3 दिवसांत तोडगा निघतो का ? याकडेही राज्याची नजर असेल.
Leave a Reply