• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Explainer : अयोध्येच्या राम मंदिरातील देणगीमध्ये कोट्यवधीची अनियमितता? जाणून घ्या नेमके प्रकरण काय? काय दावा केला जातोय?

June 13, 2026 by admin Leave a Comment


Ram Mandir Donation Controversy : अयोध्येतील राम मंदीर हे देशातील करोडो लोकांचे श्रद्धास्थान आहे. या मंदिराची उभारणी झाल्यापासून तिथे दरवर्षी कोट्यवधी लोक दर्शनासाठी जातात. विशेष म्हणजे अयोध्येतील राम मंदिरात प्रभू श्रीरामाचे दर्शन घेताच अनेकांना धन्य झाल्यासारखे वाटते. दरम्यान, आता अयोध्येतील रामजन्मभूमी परिसरात भाविकांकडून केले जाणारे दान आणि देणग्या याबाबत मोठा आणि खळबळजनक दावा केला जात आहे. भाविकांनी केलेले दान आणि देणग्यांमध्ये अनियमितता झाल्याचा दावा केला जात आहे. हे प्रकरण चांगलेच तापले असून राजकीय नेत्यांनीही यावर प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टनेदेखील या कथित दाव्यानंतर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. दरम्यान, राम मंदीर तसेच रामजन्मभूमी परिसरातील कथित देणगी अनियमिततेचे प्रकरण नेमके काय आहे? कोणी नेमका काय दावा केला आहे? तसेच या दाव्यांविषयी श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टने नेमकी काय भूमिका स्पष्ट केली आहे? ते जाणून घेऊ या…

साधारण पाच ते सात कोटींची अनियमितता?

अयोध्येतील रामजन्मभूमी आणि परिसरात केले जाणारे दान आणि देणग्या यातील कथित अनियमितता प्रकरण दिवसेंदिवस तापत चालले आहे. समाजवादी काँग्रेसचे प्रमुख अखिलेश यादव यांनी प्रकरण लावून धरल्यानंतर या कथित अनियमिततेच्या आरोपांना जास्तच हवा मिळाली आहे. अखिलेश यादव यांनी मंदिरात येणारे दान आणि देणग्या यांचे हिशोब ठेवण्यात मोठी अनियमितता झाली आहे, असा गंभीर आणि मोठा दावा केला आहे. देणग्यांमध्ये साधारण पाच ते सात कोटी रुपयांची अनियमितता झाल्याचा आरोप केला जात आहे.

भाजपा नेत्याने केली तपासाची मागणी

सध्या विरोधात असणाऱ्या राजकीय पक्षांनी हे प्रकरण लावून धरले आहे. परंतु सत्तेत असलेल्या भाजपा पक्षाचे वरिष्ठ नेते तथा प्रवक्ते रजनीश सिंह यांनीदेखील या प्रकरणी सखोल चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी केली आहे. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक पत्र लिहिले आहे. या पत्रात संपूर्ण प्रकरणाची सीबीआय किंवा अन्य एखाद्या केंद्रीय संस्थेमार्फत चौकशी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

राम मंदीर ट्रस्टची भूमिका काय?

दान आणि देणग्या यांचा हिशोब ठेवताना अनियमितता झाल्याचा आरोप होताच राम मंदीर ट्रस्टने समोर येत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. कथित अनियमिततेचे जे आरोप केले जात आहेत, त्यात कोणतेही तथ्य नाही. सर्व आरोप बिनबुडाचे आहेत, तसेच मनाच्या कथा रचून हे आरोप करण्यात आले आहेत, असे राम मंदीर ट्रस्टने सांगितले आहे. ट्रस्टचे महासचिव चंपत राय यांनी सर्व आरोपांना फेटाळून लावले आहे. मंदिरात लोक जे काही दान करतात त्याचे नियमत ऑडिट होते. या प्रकियेदरम्यान स्टेट बँकेचे अधिकारी सहभागी असतात. दान आणि देणग्यांचे पूर्ण रेकॉर्ड ठेवले जाते. आतापर्यंत करण्यात आलेल्या ऑडिटमध्ये अशा प्रकारची कोणतीही अनियमितता आढळून आलेली नाही, असा दावा चंपत राय यांनी केला आहे.

हे प्रकरण समोर नेमके कसे आले?

राम मंदीर आणि परिसरात करण्यात येणारे दान आणि देणग्यांमध्ये कथित अनियमितता झाल्याचा आरोप माजी मंत्री तथा समाजवाद पार्टीचे नेते पवन पांडेय यांनी केला. 7 जून रोजी पत्रकार परिषद घेऊन त्यांनी हा आरोप केला होता. या आरोपानंतर देशात एकच खळबळ उडाली होती. साधारण पाच ते सात कोटी रुपयांची चोरी झाली आहे, असा गंभीर आरोप त्यांनी केला होता. पवन पांडेय यांनी आरोप केल्यानंतर समाजवादी पार्टीचे नेते अखिलेश यादव यांनीदेखील हे प्रकरण लावून धरले. राम मंदीर ट्रस्टचे या प्रकरणातील मौन संशयास्पद आहे, असा आरोप त्यांनी केला.

दिग्गजांनी नेमकी काय भूमिका मांडली?

हे प्रकरण समोर येताच देशातील अनेक बड्या नेत्यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. केसरगंजचे माजी खासदार आणि दिग्गज नेते ब्रिजभूषण सिंह यांनी मोठा आरोप केला. या प्रकरणातील सत्य समोर आणलं तर मला त्याची किंमत मोजावी लागेल. नवा वाद उभा राहील. या प्रकरणात अनेक ताकदवान लोक सामील आहेत. वेळ आल्यावर सगळं सांगणार आहे, असे ब्रिजभूषण सिंह म्हणाले. तर श्रीराम जन्मभूमी ट्रस्टच्या अध्यक्षांचे उत्तराधिकारी महंत कमल नयन दास यांनी दान आणि देणग्यांविषयी जो आरोप केला जातोय, त्याची खरी चौकशी देवच करेल. चुकीचे काम करणाऱ्याला शेवटी आपल्या कर्माचे फळ भोगावे लागते, असे मत व्यक्त केले आहे.

आम आदमी पार्टीचे संजय सिंह यांनीदेखील गंभीर स्वरुपाचे आरोप केले आहेत. त्यांनी राम जन्मभूमी ट्रस्ट तसेच भाजपावर टीका केली आहे. चंपत राय यांनी प्रभू श्रीराम यांच्या मूर्तीवर हात ठेवून देणगी आणि दान यांच्यात चोरी झालेली नाही, हे सांगावे असे थेट आव्हानच संजय सिंह यांनी दिले आहे. स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांनीदेखील चंपत राय यांच्यावर टीका केली आहे. रक्षण करणाराच जर चोर असेल तर अशा प्रकारच्या घटना घडू शकतात, असं स्वामी अविमुक्तेश्वरानंद म्हणाले आहेत.

मंदीर निर्माण समितीची बैठक

दान आणि देणगी यातील कथित गैरव्यवहार समोर आल्यानंतर राम मंदीर निर्माण समितीची तीन दिवसीय बैठक आयोजित करण्यात आली आहे. 13 जून रोजीपासून या बैठकीला सुरुवात झाली आहे. या बैठकीत मंदीर निर्माण कामातील देणगी प्रकरणात काय उत्तर द्यावे यावर विचार केला जाऊ शकतो. तसेच तपास समितीच्या बाबतीतही निर्णय घेतला जाऊ शकतो. दरम्यान भाजपाचे नेते डॉ. रजनीश सिंह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून या प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी केली आहे. सोबतच या प्रकरणाची चौकशी करणाऱ्या संभाव्य समितीच्या विश्वासार्हतेवरही त्यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या समितीच्या निष्पक्ष चौकशीसाठी मी पंतप्रधानांना आणखी एक पत्र लिहणार आहे, असे त्यांनी सांगितले आहे.

राम मंदीर ट्रस्टची कहाणी काय आहे?

दरम्यान, 2019 साली सर्वोच्च न्यायालाने राम जन्मभूमीच्या प्रकरणात ऐतिहासिक निर्णय दिल्यानंतर केंद्र सरकारने अयोध्येत राम मंदिराच्या निर्मितीसाठी तसेच या मंदिराच्या व्यवस्थापनासाठी एका ट्रस्टची स्थापना करण्याचा निर्णय घेतला. 5 फेब्रुवारी 2020 रोजी सरकारने श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टची स्थापना केली. याच ट्रस्टकडून आज राम मंदिराची निर्मिती, या मंदिराची देखभाल, दान, देणगी यांची काळजी, राम जन्मभूमी परिसराचे व्यवस्थापन केले जाते. दरम्यान सध्या देणगीच्या कथित गैरव्यवहाच्या प्रकरणात आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. त्यामुळे भविष्यात नेमके काय होणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • मुंबई पोलिसांच्या ताफ्यात 100 नवीन वाहनं, अदाणी फाऊंडेशनकडून 15 कोटींचा निधी
  • CCTV फुटेज, रेकॉर्डिंग सगळं बाहेर काढेन; ‘बिग बॉस’ फेम अभिनेत्रीचा थेट इशारा, म्हणाली ‘27.11.23’ची ती सकाळ आठवतेय?
  • Sugar Price Hike : साखरेचा भाव वाढताच प्रशासनाचा मोठा आदेश, आता 30 दिवसांपेक्षा जास्त काळ…सामान्यांवर काय परिणाम होणार?
  • IND vs SL : रवींद्र जडेजाने अखेर सूड घेण्यासाठी सात दिवस घेतले! श्रीलंकन खेळाडूसोबत काय घडलं होतं?
  • मराठी सक्तीविरोधात रिक्षा, टॅक्सी चालकांची उच्च न्यायालयात धाव

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in