
Abhijeet Dipke Big Appeal to PM Narendra Modi: व्यंगात्मक सोशल मीडिया मोहिमेचे प्रतिनिधीत्व करणारी कॉकरोच जनता पार्टी आता मैदानात उतरत आहे. आतापर्यंत डिजिटल प्लॅटफॉर्मवर ठोस भूमिका घेणाऱ्या झुरळांनी दिल्लीतील जंतर मंतरवर आंदोलनाची हाक दिली आहे. संस्थापक अभिजीत दीपके हे दिल्लीत दाखल झाले आहेत. आंदोलनाची दिशा ठरवल्यानंतर आता त्याला तरुणाईचा कितपत प्रतिसाद मिळतो याकडे देशाचेच नाही तर जगाचे लक्ष लागले आहे. दरम्यान कॉकरोच जनता पार्टीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मोठे आवाहन केले आहे.
अभिजीत दीपके दिल्लीत, आंदोलनासाठी पोलिसांची घेणार परवानगी
दरम्यान CJP चे संस्थापक अभिजीत दीपके हे दिल्लीत दाखल झाले आहेत. सकाळीच ते दिल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळावर दाखल झाले. इथून ते पार्लियामेंट स्ट्रीट पुलिस स्टेशन येथे परवानगीसाठी जातील. पोलिसांकडून रीतसर आंदोलनासाठी परवानगी मागतील. कायद्याच्या परीघातच सर्व कार्यवाही करण्यात येईल. त्यानंतर पार्लियामेंट स्ट्रीट पुलिस स्टेशन इथून जंतर-मंतर येथे जातील.
आंदोलन अत्यंत शांततापूर्वक आणि लोकशाही पद्धतीने होईल. आंदोलकांनी येताना तिरंगा, पुस्तकं आणि फुलं आणावीत. तसेच त्यांनी आई-वडील, नातेवाईकांसह या आंदोलनात सहभागी व्हावे असे मोठे आवाहन कॉकरोच जनता पार्टीने केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मोठे आवाहन
कॉकरोच जनता पार्टीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मोठे आवाहन केले आहे. “आपल्या देशाचे शिक्षण मंत्री त्यांची जबाबदारी पूर्ण करण्यात सपशेल अपयशी ठरले आहेत. त्यांच्यामुळे आपल्या शिक्षण व्यवस्थेचे मोठे नुकसान झाले आहे. नीटची प्रश्नपत्रिका फुटली आहे. कोट्यवधी तरुण चिंतेत आहेत. काहींनी आत्महत्या केली आहे. मोदीजी, कृपा करून धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्या आणि लोकशाहीवरील आमचा विश्वास अधिक मजबूत करा.” असे आवाहन कॉकरोच जनता पार्टीने केले आहे.
दिल्लीत पोलीसांचा मोठा बंदोबस्त
दिल्लीत विमानतळापासून ते जंतर – मंतर मैदानापर्यंत पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे. अनेक ठिकाणी पोलीस तैनात करण्यात आले आहे. पोलिसांचा तगडा बंदोबस्त चौका-चौकात लावण्यात आलेला आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त लावण्यात आला आहे. प्रत्येक वाहनांची आणि बॅगची तपासणिी करण्यात येत आहे. अनेक ठिकाणी बॅरिकेट्स लावण्यात आले आहेत. पोलिसांचा मोठा फौजफाटा असल्याने या परिसराला छावणीचे स्वरूप आले आहे.
Leave a Reply