
Aishwarya Rai: 2014 मध्ये प्रदर्शित झालेला ‘हॅपी न्यू इअर’ हा चित्रपट प्रचंड यशस्वी ठरला होता. यात दीपिका पादुकोणसोबत शाहरुख खान आणि अभिषेक बच्चन यांनी भूमिका साकारल्या होत्या. फार कमी लोकांना ही गोष्ट माहीत असेल की, दीपिकाच्या आधी दिग्दर्शिका फराह खानने मुख्य भूमिकेसाठी ऐश्वर्या राय बच्चनची निवड केली होती. त्यावेळी ऐश्वर्या मुलगी आराध्याला जन्म दिल्यानंतर चित्रपटांमध्ये पुनरागमन करण्याच्या तयारीत होती. मात्र नंतर तिने ‘हॅपी न्यू इअर’ करण्यास नकार दिला. ऐश्वर्याच्या करिअरमधील अनेक चित्रपट आजही चर्चेत आहेत. मात्र, तिने नाकारलेल्या चित्रपटांची यादीही तितकीच रंजक आहे. ‘हॅपी न्यू इअर’ हा चित्रपट ऐश्वर्याच्या कमबॅकसाठी उत्तम पर्याय ठरू शकला असता. तरीही तिने हा चित्रपट नाकारला. त्यामागे तिचा पती आणि अभिनेता अभिषेक बच्चन असल्याचं आता पुन्हा एकदा समोर आलं आहे.
फराह खानने दिली होती ऑफर
फराह खान दिग्दर्शित ‘हॅपी न्यू इअर’मध्ये ऐश्वर्याला मोहिनीची भूमिका ऑफर करण्यात आली होती. चित्रपटात शाहरुख खान मुख्य भूमिकेत होता, तर अभिषेक बच्चनदेखील महत्त्वाच्या भूमिकेत होता. अखेर ही भूमिका दीपिका पादुकोणने साकारली. 2014 मध्ये प्रदर्शित झालेला हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरला. ऐश्वर्याने एका जुन्या मुलाखतीत या निर्णयामागचं कारण स्पष्ट केलं होतं. तिच्या मते, ‘हॅपी न्यू इअर’ हा बाळंतपणानंतर मोठ्या पडद्यावर पुनरागमन करण्यासाठी ‘परफेक्ट’ चित्रपट ठरू शकला असता. मात्र, चित्रपटात अभिषेक तिच्यासोबत जोडीदाराच्या भूमिकेत नव्हता, तर तिची जोडी शाहरुख खानसोबत दाखवली जाणार होती.
ऐश्वर्याच्या मते, प्रेक्षकांनी तिला आणि अभिषेकला एकत्र पडद्यावर पाहिल्यानंतर त्याच चित्रपटात तिची जोडी दुसऱ्या अभिनेत्यासोबत दाखवणं काहीसं विचित्र वाटू शकत होतं. त्यामुळे तिने अभिनेत्री म्हणून नव्हे, तर एक पत्नी म्हणून या परिस्थितीकडे पाहिलं आणि चित्रपट न करण्याचा निर्णय घेतला. ऐश्वर्या आणि अभिषेक यांनी ‘ढाई अक्षर प्रेम के’, ‘कुछ ना कहो’, ‘उमराव जान’, ‘गुरू’ आणि ‘रावण’ यांसारख्या चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं आहे. त्यामुळे त्यांच्या ऑनस्क्रीन जोडीला प्रेक्षकांकडूनही विशेष पसंती मिळाली होती.
दीपिकाच्या वाट्याला आली भूमिका
ऐश्वर्याने नकार दिल्यानंतर ‘हॅपी न्यू इअर’मधील मोहिनीची भूमिका दीपिका पादुकोणकडे गेली. शाहरुख आणि दीपिकाची जोडी याआधी ‘ओम शांती ओम’ आणि ‘चेन्नई एक्सप्रेस’मध्ये गाजली होती. ‘हॅपी न्यू इयर’मधील त्यांची केमिस्ट्रीही प्रेक्षकांना आवडली.
Leave a Reply