
NEET पेपर लिकच्या प्रकरणात विद्यार्थ्यांना एकत्र जोडणे हा या आंदोलनाचा परिपाक होता. सरकारच्या विरोधातला लढा आपण सगळ्यांनी एकत्र येऊन लढला आहे. अभिजीत दिपके यांनी आंदोलनात सातत्य ठेवलं आणि त्यांना पाठिंबा वाढत गेला. पोलिसांनी दिल्लीत लाठीचार्ज केला आणि नंतर अख्खा देश एक झाला आणि त्या एकीचा विजय काल आपल्याला पाहायला मिळाला. अभिजीत दिपके यांच्यासोबत फोनवरून सतत चर्चा करत होतो. हा लढा कुठल्याही राजकीय पक्षांनी लढलेला नाही, सामान्य घरातल्या मुलांनी एकत्रित येऊन लढलेला हा लढा आहे असे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी म्हटले आहे.
हा लढा विद्यार्थ्यांचा होता त्यानंतर विरोधी पक्षांनी पाठिंबा दिला. भाजपातले काही नेते आणि त्यांची ट्रॉलिंग टीमचा भ्रमनिरास झाला आहे. ही दहा पैशांची टीम कशी काम करते याचा अभ्यास मला आहे. जर राजकीय नेते व्यासपीठावर दिसले असते तर भाजपने आंदोलनाला वेगळा रंग दिला असता असेही रोहित पवार यांनी म्हटले आहे.
तुम्ही त्यांचा इगो हर्ट केला
अंधभक्तांचा अहंकार काल तुम्ही सगळ्यांनी मोडला आहे. आंदोलन राजकीय होऊ नये म्हणून आम्ही आधी त्या आंदोलनात गेलो नाही. आता कुठलाही विचार न करता पुढ जायचं आहे. तुम्ही लोकांनी ठरवलं म्हणून आपल्याला विजय मिळाला. या आंदोलनाने सत्ताधारी लोकांचा अहंकार मोडला आहे. तुम्ही त्यांचा इगो हर्ट केला आहे असे शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी म्हटले आहे.
लोक न घाबरता लढायला तयार
अनेक लोक विचार करत होते की लढू की नको ? आमच्या भोवती ईडी लागली, पण आम्ही कुणाला घाबरत नाही. तुम्ही सगळे भारतीय म्हणून एकत्र आलात. जाती धर्माच्या पलीकडे जाऊन तुम्ही एक झालात. आता बरेच लोक रस्त्यावर येऊन न घाबरता लढायला तयार होतील. एका मंत्र्यांचा तुम्ही राजीनामा घेतला हे तुमचं यश आहे असेही रोहित पवार यांनी सांगितले.
पाऊस येतोय पण तुम्ही घाबरणार नाहीत, एवढ्या मोठ्या बलाढ्य शक्तीला तुम्ही घाबरला नाहीत तर पावसाला काय घाबराल. या आंदोलनामुळे एकी दिसली. दिल्लीत भारत आणि इंडिया एक झाला. यापुढे शेतकऱ्यांवर अन्याय झाला तरी एकत्रित या, मजुरांवर अन्याय झाला तरी एकत्रित या, मुलींंवर आणि महिलांवर अत्याचार झाला तरी एकत्रित या. आता ही तुमची जबाबदारी आहे असे रोहित पवार यांनी म्हटले आहे.
त्या विरोधात रस्त्यावर उतरावे लागणार
तुमची एकजूट राज्यकर्त्यांना इशारा देत आहे की नीट चाल नाहीतर आम्ही तुझ्याकडे बघून घेऊ. रस्त्यावरचा लढा आपण लढू शकतो. पुढच्या वेळी मतदान करा आणि कुणाला करायचं ते ठरवून करा. संविधानाच्या आणि लोकशाहीच्या विरोधात जो कोणी कार्य करेल त्याच्या विरोधात आपल्याला रस्त्यावर उतरावे लागणार आहे. आता आपल्यावर जबाबदारी वाढली आहे असेही रोहित पवार शेवटी म्हणाले आहेत.
Leave a Reply