
नीट पेपरफुटी प्रकरणी दिल्लीतील जंतर मंतर येथे कॉकरोच जनता पार्टीने आंदोलन केले. वेगवेगळ्या राज्यातील विद्यार्थी या आंदोलनात सीजेपीसोबत सहभागी झाले. या विद्यार्थ्यांनी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती आणि यात त्यांना यशही मिळाले. त्यानंतर आता कॉकरोच जनता पार्टीचा संस्थापक अभिजीत दीपके यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. आता नेमकं प्रकरण काय आहे? वाचा…
नेमकं प्रकरण काय आहे?
दिल्लीतील आंदोलनात अल्पवयीन मुलांच्या उपस्थितीवरून CJP नेते अभिजीत दीपके आणि इतरांविरोधात इंदौर गुन्हे शाखेकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. मुंबईतील सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर फैझान अंसारी याने चौकशीची मागणी केली आहे. ‘नीट’ (NEET) पेपर फुटीविरोधातील आंदोलनात अल्पवयीन मुलांना आणण्यात आणि सहभागी करून घेण्यात सहभाग असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
चौकशीची मागणी
तपासात गुन्हा आढळल्यास पोक्सो (POCSO), भारतीय न्याय संहिता (BNS), आयटी ॲक्ट आणि बाल न्याय कायद्यांतर्गत एफआयआर (FIR) नोंदवण्याची मागणी करण्यात आली आहे. पण अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही. सीसीटीव्ही फुटेज, फोटो, व्हिडीओ आणि सोशल मीडिया सामग्रीचीही चौकशी करण्याची विनंती केली आहे. यावर अभिजीत दीपके यांनी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. ते काय प्रतिक्रिया देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
ड्युटीवर असलेल्या पोलीस अधिकाऱ्याचा अपमान
तर दुसरीकडे अभिजीत दिपके कॉक्रोच जनता पार्टी संपादक यांच्या निवासस्थानी पोलीस संरक्षणादरम्यान ड्युटीवर असलेल्या पोलीस अधिकाऱ्याचा अपमान केल्याचा आरोप करण्यात आला आहे. पोलीस संरक्षणादरम्यान एका अनोळखी व्यक्तीला अभिजीत दिपके यांची भेट घेण्यासाठी प्रवेश देण्यापूर्वी पोलीस अधिकाऱ्यांकडून त्याची विचारपूस करण्यात येत होती. यावेळी संबंधित व्यक्ती आणि पोलीस अधिकाऱ्यामध्ये वाद झाला. त्याचवेळी अभिजीत दिपके घटनास्थळी आले आणि त्यांनी ड्युटीवरील अधिकाऱ्याला ‘गेट आऊट’ असे शब्द वापरल्याचा आरोप महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेने केला आहे.
Leave a Reply