
King Of Action: चित्रपटसृष्टीच्या चमकदार पडद्यामागे अनेक संघर्षमय कथा दडलेल्या असतात. काही कलाकारांना यश सहज मिळत नाही; त्यासाठी वर्षानुवर्षांची मेहनत, अपयश आणि जिद्द लागते. अशीच प्रेरणादायी कहाणी आहे जगप्रसिद्ध अॅक्शन स्टार सिल्वेस्टर स्टॅलोन यांची, ज्यांनी आपल्या कमतरतांनाच ताकद बनवत जागतिक स्तरावर ‘किंग ऑफ अॅक्शन’ म्हणून ओळख निर्माण केली.
चित्रपटसृष्टीत प्रवेश करणे जितकं सोपं वाटतं, तितकं प्रत्यक्षात नसतं. स्टॅलोन यांच्या बाबतीत तर परिस्थिती आणखी कठीण होती. त्यांच्या चेहऱ्याचा वेगळा आकार आणि आवाजामुळे सुरुवातीच्या काळात त्यांना अनेकदा नकार मिळाला. कास्टिंग डायरेक्टर्स त्यांची खिल्ली उडवत असत पण त्यांनी हार मानली नाही. हजारो वेळा रिजेक्शन मिळूनही त्यांनी प्रयत्न सुरूच ठेवले.
बालपण आणि आर्थिक संघर्ष
सिल्वेस्टर स्टॅलोन यांचं बालपणही संघर्षमय होतं. जन्मावेळी झालेल्या वैद्यकीय चुकांमुळे त्यांच्या चेहऱ्याच्या नसांवर परिणाम झाला, ज्यामुळे त्यांचा चेहरा आणि बोलण्याची शैली वेगळी झाली.लहान वयातच त्यांच्या आई-वडिलांचा घटस्फोट झाला आणि काही काळ त्यांना अनाथालयासारख्या परिस्थितीतही राहावं लागलं. पुढे आर्थिक अडचणी इतक्या वाढल्या की त्यांना न्यूयॉर्कच्या बस स्थानकावर रात्री काढाव्या लागत होत्या.
एक काळ असा आला की त्यांच्या गर्भवती पत्नीच्या उपचारासाठीही पैसे नव्हते. परिस्थिती इतकी बिकट झाली की त्यांनी आपला लाडका कुत्रा ‘बटकस’ फक्त 40 डॉलर्सला विकावा लागला. हा त्यांच्या आयुष्यातील अत्यंत वेदनादायक क्षण होता.
‘रॉकी’ने बदललं नशीब
स्टॅलोन यांनी स्वतः लिहिलेल्या रॉकी या चित्रपटाने त्यांच्या आयुष्याला कलाटणी दिली. निर्मात्यांना ही कथा खूप आवडली होती, पण मुख्य भूमिकेसाठी दुसऱ्या मोठ्या अभिनेत्याला घेण्याची अट ठेवली होती. मात्र, स्टॅलोन यांनी ठामपणे नकार दिला. त्यांना खात्री होती की ‘रॉकी’ ही भूमिका फक्त तेच करू शकतात.
शेवटी कमी बजेटमध्ये त्यांनाच मुख्य भूमिका मिळाली आणि 1976 मध्ये प्रदर्शित झालेला हा चित्रपट प्रचंड गाजला. या चित्रपटाने जगभरात 225 मिलियन डॉलर्सपेक्षा जास्त कमाई केली आणि तीन ऑस्कर पुरस्कार जिंकले. त्यानंतर त्यांनी मिळालेल्या यशातून सर्वप्रथम आपला कुत्रा ‘बटकस’ परत विकत घेतला. विशेष म्हणजे, ‘रॉकी’ चित्रपटात त्याला छोटासा रोलही देण्यात आला.
Leave a Reply