
11 July Plane Crash : वर्ष बदलले परंतु दर वेळी विमान अपघाताची तारीख 11 जुलैच राहिली. 1946 पासून 2011 पर्यंत 11 जुलै या दिवशीच घडलेल्या वेगवेगळ्या विमान अपघाताच्या घटनांमध्ये 618 लोकांचा मृत्यू झाला. काही अपघातांमध्ये पायलटचा हट्ट भोवला तर एका घटनेमध्ये बाथरूममध्ये प्रवाशाने केलेल्या एका चुकीमुळे अख्ख विमान जळून खाक झालं. एका घटनेत विमान एमरजेन्सी लँड करताना एअर होस्टेसने केलेल्या एका चुकीमुळे शेकडो प्रवाशांचा जीव गेला. हे सर्व विमान अपघात वेगवेगळ्या वर्षी घडले, परंतु सर्व विमान अपघाताची तारीख तीच होती 11 जुलै. 1946 पासून 2011 पर्यंत 11 जुलै रोजी झालेल्या विमान अपघातांच्या घटनांमध्ये तब्बल 618 लोकांनी आपला जीव गमावला.
पहिला विमान अपघात हा 11 जुलै 1946 साली घडला होता. ज्या विमानाचा अपघात झाला ते विमान ट्रांस वर्ल्ड एअरलाइन्सचं होतं. हे एक ट्रेनी विमान होतं. या विमानामध्ये एकही प्रवासी नव्हता, परंतु 6 क्रू मेंबर प्रवास करत होते. अचानक विमानात शॉट सर्किट झाला, त्यानंतर विमानातून धूर निघू लागला. पायलटने विमानावरील आपलं नियंत्रण गमावलं आणि हे विमान जमिनीवर कोसळलं, या अपघातामध्ये 5 क्रू मेंबरचा मृत्यू झाला होता. त्यानंतर दुसरी घटना ही 11 जुलै 1973 रोजी घडली होती, ज्या विमानाचा अपघात झाला त्या विमानात 134 प्रवाशी होते. या विमानाला टेक ऑफनंतर अचानक आग लागली आणि हे विमान जळून खाक झालं, या अपघातामध्ये 123 प्रवाशांचा मृत्यू झाला. चौकशीदरम्यान असं आढळून आलं की या विमानात एका प्रवाशाने बाथरूमध्ये जाऊन सिगारेट ओढली, त्यामुळे विमानाला आग लागली. या अपघातामध्ये केवळ 11 प्रवाशी वाचले होते.
11 जुलै 1979 साली विमानाचा एक भीषण अपघात घडला होता. इंडोनेशियाचं एक विमान तब्बल 1,690 मीटर उंचीवर माउंट सिबायक ज्वालामुखीला धडकलं या अपघातामध्ये 61 लोकांचा मृत्यू झाला. पायलटला चुकीचं लोकेशन मिळाल्याने हा अपघात झाल्याचं नंतर समोर आलं. 11 जुलै 1983 ला टमे इक्वाडोरचं विमान क्विटोवरून कुएंकाच्या दिशेनं टेक ऑफ झालं होतं. मात्र दाट धुके असल्यामुळे विमान उड्डाणामध्ये प्रचंड अडचणी येत होत्या तरी देखील पायलटने विमान उड्डाण सुरूच ठेवलं हे विमान एका उंच डोंगराला धडकून क्रॅश झालं, या अपघातामध्ये सर्व 119 लोकांचा मृत्यू झाला होता.
Leave a Reply