
आपण जेव्हा लांबच्या प्रवासाला निघतो, तेव्हा महामार्ग (Highway) आणि द्रुतगती मार्ग (Expressway) हे शब्द अनेकदा ऐकतो. आपल्याला हे दोन्ही रस्ते एकच वाटतात, पण तांत्रिकदृष्ट्या यात जमीन-अस्मानाचा फरक असतो.
हायवे आणि एक्सप्रेस वे या दोघांची रचना, वेगमर्यादा आणि प्रवेशाचे नियम पूर्णपणे वेगळे असतात. आज आपण यात नक्की फरक काय असतो याबद्दलची माहिती जाणून घेणार आहोत.
राष्ट्रीय महामार्ग म्हणजेच हायवे हे देशातील विविध शहरे, राज्ये आणि महत्त्वाची ठिकाणे एकमेकांना जोडतात. हे रस्ते अनेक ठिकाणी स्थानिक रस्ते किंवा गल्ल्यांना जोडलेले असतात. त्यामुळे महामार्गावर ठिकठिकाणी चौक किंवा सिग्नल पाहायला मिळतात.
द्रुतगती मार्ग म्हणजेच एक्सप्रेस वे हे महामार्गांचे प्रगत रूप आहे. हे रस्ते कंट्रोल्ड ॲक्सेस (Controlled Access) असतात. याचा अर्थ असा की, तुम्ही महामार्गाप्रमाणे कुठूनही या रस्त्यावर शिरू शकत नाही किंवा बाहेर पडू शकत नाही. यासाठी ठराविक इंटरचेंज किंवा रॅम्प बनवलेले असतात.
हायवेवर स्थानिक वाहतूक आणि चौक असल्याने वाहनांचा वेग साधारणपणे १०० किमी प्रति तास मर्यादित असतो. तर एक्सप्रेस वे हे रस्ते विनाअडथळा प्रवासासाठी डिझाइन केलेले असतात, त्यामुळे येथे वेगमर्यादा १२० किमी प्रति तास पर्यंत असते.
हायवेवर दुचाकी, ट्रॅक्टर, रिक्षा आणि बैलगाड्या यांसारखी सर्व प्रकारची वाहने धावू शकतात. मात्र, एक्सप्रेस वे वर सुरक्षिततेच्या कारणास्तव कमी वेगाच्या वाहनांना (उदा. दुचाकी, सायकल, ट्रॅक्टर) यांना अनेकदा प्रवेश नाकारला जातो. येथे फक्त अवजड आणि वेगवान चारचाकी वाहनांनाच परवानगी असते.
या दोन्ही रस्त्यांवर टोल आकारला जातो, पण एक्सप्रेस वे वर प्रवासाचा वेग जास्त आणि सुविधा (उदा. सीसीटीव्ही, कुंपण, फूड मॉल्स) अधिक असल्याने तेथील टोलचे दर हायवेच्या तुलनेत थोडे जास्त असू शकतात.
एक्सप्रेस वे च्या दोन्ही बाजूंना कुंपण (Fencing) असते, ज्यामुळे प्राणी किंवा पादचारी अचानक रस्त्यावर येत नाहीत. यामुळे अपघाताचा धोका कमी होतो आणि प्रवास अधिक सुरक्षित होतो. याउलट हायवेवर स्थानिक वस्तीतून रस्ता जात असल्याने तेथे अधिक खबरदारी घ्यावी लागते.







Leave a Reply