
पाकिस्तानात पुन्हा एकदा अज्ञात हल्लेखोरांनी दहशतवाद्यांविरोधात मोहिम सुरु केली आहे. हे हल्लेखोर दहशतवाद्यांसाठी काळ बनून येत आहेत. पाकिस्तानात मागच्या तीन-चार वर्षात अशा रहस्यमयी हल्ल्यांमध्ये अनेक दहशतवाद्यांचा खात्मा झाला आहे. आता त्यात आणखी एका दहशतवाद्याचा समावेश झाला आहे. लश्कर-ए-तैयबाचा मुख्य चेहरा आणि हाफिज सईदचा निकटवर्तीय शेख यूसुफ अफ्रिदी यांची हत्या झाली आहे. अज्ञात हल्लेखोरांनी त्याच्यावर गोळ्या झाडल्या. ही घटना खैबर पख्तूनख्वाच्या लांडी कोतल मध्ये झाली. इस्लामाबाद पासून हा भाग 250 किलोमीटर लांब आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काही शस्त्र हल्लेखोरांनी शेख युसूफ आफ्रिदीवर अंदाधुंद गोळीबार केला. यात त्याचा जागीच मृ्त्यू झाला.
या हल्ल्याची अजूनपर्यंत कुठल्याही संघटनेने जबाबदारी घेतलेली नाही. या घटनेनंतर या भागात तणाव आणि संतापाचं वातावरण आहे. शेख युसूफ आफ्रिदीची लष्कर-ए-तैयबाच्या क्षेत्रीय रचनेत महत्वाची भूमिका होती. लश्कर-ए-तैयबावर बंदी आहे. आफ्रिदी खैबर पख्तूनख्वामध्ये संघटनेसाठी भरती आणि समन्वय ही कामं पहायचा. हाफिज सईदची दुसरी संघटना जमात-उद-दावाच्या प्रवक्त्याने आफ्रिदीला धार्मिक विद्वान म्हटलं. अहल-ए-हदीस विचारधारेचा तो मुख्य चेहरा होता. बरोबर एक आठवडाआधी लाहोरमध्ये आमिर हमजावर हल्ला झाला होता. यात तो जखमी झालेला. हमजाचा लष्कर-ए-तैयबाच्या संस्थापक नेत्यांमध्ये समावेश होतो.
याला ‘शॅडो वॉर’ म्हणतात
लष्करमध्ये हाफिज सईनंतर आमिर हमजा संघटनेत दुसरा मोठा चेहरा आहे. पाकिस्तानात 2023 पासून अज्ञात हल्लेखोरांकडून दहशतवाद्यांना टार्गेट करण्याचा सिलसिला कायम आहे. याला ‘शॅडो वॉर’ म्हटलं जातं. यात पाकिस्तानात बसून भारतविरोधी कारवाया करणारे 20 पेक्षा जास्त दहशतवादी मारले गेले आहेत. यात शाहिद लतीफ, परमजीत सिंह पंजवड, अदनान अहमद आणि मुफ्ती कैसर फारूक सारखे दहशतवादी आहेत.
पाकिस्तानातील दहशतवादी घाबरले
त्याशिवाय मोहम्मद ताहिर अनवरचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला आहे. या सर्व घटनांमध्ये एकसारखाच पॅटर्न आहे. आधी रेकी केली जाते. मग हल्लेखोर येतात. टार्गेटला संपवून लगेच निघून जातात. पाकिस्तान सरकार एकतर या घटनांवर मौन धारण करते किंवा आपसातील वैमनस्यातून मारले गेल्याचं कारण दिलं जातं. अशा प्रकारच्या हत्यांमुळे पाकिस्तानातील दहशतवादी घाबरले आहेत.
Leave a Reply