
राज्यभरात घडणाऱ्या गुन्ह्याच्या विविध घटनांमुळे महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. राज्यात कायद्याचा धाक आहे की नाही, असा प्रश्न पडावा, अशा काही घटना गेल्या काहीव दिवसांत घडल्या आहेत. मात्र याच दरम्यान डोंबिवलीमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. डोंबिवलीत तरुणीचं ‘शक्ती’ रूप दिसलं असून विकृत इसमाला सापळ्यात अडकवून चोप देत तिने त्याला पोलिसांच्या हवाली केलं. मुंब्र्यात राहणारा जावेद खान असे आरोपीचे नाव असून पोलिसांनी त्यांच्यावर विनयभंगासह अनेक गुन्हा दाखल केले असून, त्याची गाडी देखील जप्त केली आहे.
महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर असतानाच डोंबिवलतील या बातमीतून सर्वांनी शिकण्यासारख आहे. वारंवार मेसेज करून आणि पैशांचं आमिष दाखवून एका तरुणीला त्रास देणाऱ्या विकृत तरुणाला, त्या तरूणीनेच धडा शिकवला आहे. मुंब्र्याहून आलेल्या जावेद खान नावाच्या या तरुणाने तरुणीला जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न केला खरा, पण तरुणीने नातेवाईकांच्या मदतीने असा काही ‘फिल्मी स्टाईल’ सापळा रचला की या विकृताला पळायला जागा उरली नाही. भररस्त्यात जावेदला पकडून पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आलं आहे. काय आहे हा नेमका प्रकार, चला जाणून घेऊया..
असा रचला ‘फिल्मी स्टाईल’ सापळा
वांगणी परिसरात राहणाऱ्या आणि कॉलेजमध्ये शिक्षण घेणाऱ्या एका तरुणीला गेल्या काही दिवसांपासून एका अनोळखी नंबरवरून व्हॉट्सॲपवर मेसेज येत होते. मेसेज करणारी व्यक्ती तिला पैशांचे आमिष दाखवून लॉजवर भेटण्यासाठी बोलावून त्रास देत होता. मात्र, या तरुणीने घाबरून न जाता या विकृत तरुणाला अद्दल घडवण्याचा निर्णय घेतला आणि तिच्या एका धाडसी निर्णयामुळे आरोपी आज गजाआड आहे. १९ एप्रिलपासून सुरू झालेला हा त्रासाचा सिलसिला थांबवण्यासाठी तरुणीने आपल्या नातेवाईकांना कल्पना दिली.
त्यानंतर नातेवाईकांच्या सल्ल्यानुसार, त्या तरुणीने आरोपी जावेद खानला डोंबिवलीत भेटायला बोलावले. त्यावरून जावेदला वाटलं की ही तरुणी त्याच्या आमिषाला बळी पडली आहे, म्हणून तो तातडीने मुंब्र्याहून आपली कार घेऊन डोंबिवलीत पोहोचला. ठरल्याप्रमाणे जावेदने तरुणीला गाडीत बसण्यासाठी जबरदस्ती करण्यास सुरुवात केली. मात्र, त्याच वेळी दबा धरून बसलेल्या, त्या तरुणीच्या नातेवाईकांनी आणि हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी जावेदला घेरलं.
तो पळून जाण्याच्या तयारीत होता, मात्र कार्यकर्त्यांनी जावेदला पकडून चांगलाच चोप दिला आणि त्यानंतर त्याला रामनगर पोलिसांच्या स्वाधीन केलं. राम नगर पोलिसांनी जावेद खान याच्याविरोधात विनयभंग आणि इतर कलमान्वये गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. तसेच आरोपी वापरत असलेली चारचाकी गाडीही पोलिसांनी ताब्यात घेतली असून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे. घाबरून न जाता, स्वतः पुढाकार घेऊन अशा विकृत मानसिकतेच्या तरुणाला धडा शिकवणाऱ्या या तरुणीचे डोंबिवली आणि वांगणी परिसरातून कौतुक होत आहे. “मुलींनी घाबरण्याऐवजी सतर्क राहून पोलिसांची मदत घेतली तर अशा गुन्हेगारांवर वचक बसेल,” अशी प्रतिक्रिया लोकांकडून व्यक्त होत आहे.
Leave a Reply