
बॉलिवूडच्या सर्वांत चर्चेतल्या अपूर्ण प्रेम कहाण्यांपैकी एक अभिनेत्री माधुरी दीक्षित आणि संजय दत्त यांची होती. 1990 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘थानेदार’ या चित्रपटाच्या सेटवर दोघांची पहिली भेट झाली होती. या भेटीचं रुपांतर पुढे प्रेमात होईल याचा कोणी विचारसुद्धा त्यावेळी कोणी केला नसेल. या दोघांची केमिस्ट्री इतकी जबरदस्त होती की त्यांची जोडी तुफान हिट झाली. नंतर दोघांनी ‘साजन’मध्येही एकत्र काम केलं. हा चित्रपट आणि त्याच्याशी जोडलेले लोक माधुरी आणि संजय यांच्या प्रेमाचे साक्षीदार बनले. कारण सेटवर असलेल्या सर्वांनाच त्यांच्यातील जवळीक स्पष्ट दिसू लागली होती. या दोघांना एकमेकांसोबत वेळ घालवायला खूप आवडायचं. परंतु माधुरीसोबतच्या अफेअरच्या वृत्तांमुळे संजयची पत्नी रिचा शर्माला खूप त्रास व्हायचा. आता ‘साजन’ या चित्रपटाच्या दिग्दर्शकांनीच सेटवरील किस्सा सांगितला आहे.
नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत ‘साजन’चे दिग्दर्शक लॉरेन्स डिसूझा म्हणाले, “त्यावेळी संजू बाबा अॅक्शन हिरो होता आणि या चित्रपटात आम्ही त्याला थेट लंगडं बनवलं होतं. लोकांनी म्हटलं होतं की हा चित्रपट चालणारच नाही. मला काहीजण पागल म्हणायचे. अॅक्शन हिरोला लंगडं बनवून ठेवलं, असं म्हणायचे.” पुढे दिग्दर्शकांना विचारण्यात आलं की, माधुरी आणि संजय यांची लव्ह-स्टोरी याच चित्रपटापासून सुरू झालेली का? त्यावर त्यांनी सांगितलं, “आम्ही त्यावर कधी लक्ष दिलं नाही. कारण शूटिंगदरम्यान आमची इतकी मजा-मस्ती सुरू असायची की काम कधी संपलं ते कळायचंच नाही. पण मी या चित्रपटाचा कॅमेरामनसुद्धा होतो. संजू बाबा कधी कधी येऊन माधुरीचे क्लोज शॉट्स पाहत बसायचा. नंतर लोकांनी मला त्यांच्याविषयी सांगितलं, पण मला खरंच त्यावेळी कल्पना नव्हती. मी चित्रपट बनवण्यातच व्यस्त होतो.”
1993 मध्ये जेव्हा संजय दत्तला अटक झाली, तेव्हापासून त्यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला होता. माधुरीला अपेक्षा होती की तो तिच्याशी लग्न करेल. परंतु संजयने आधीच वैवाहिक आयुष्यातील समस्यांचा सामना केला होता. त्यामुळे त्याला पुन्हा लग्नाच्या बंधनात अडकायचं नव्हतं, असा दावा सिनेपत्रकार ज्योती व्यंकटेश यांनी केला होता. संजय दत्तने अभिनेत्री ऋचा शर्माशी 1987 मध्ये लग्न केलं होतं. 1996 मध्ये ऋचाचं कॅन्सरमुळे निधन झालं होतं.
Leave a Reply