
‘पंचायत’ या लोकप्रिय वेब सीरिजमधून प्रेक्षकांच्या मनात घर करणारे अभिनेता फैसल मलिक आता एका मोठ्या प्रोजेक्टसाठी सज्ज झाले आहेत. रणबीर कपूर स्टारर बहुप्रतिक्षित ‘रामायण’ या चित्रपटात फैसल मलिक कुंभकर्णाची भूमिका साकारताना दिसणार आहेत. चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये त्यांचा दमदार आणि वेगळा लूक पाहायला मिळत असून, प्रोस्थेटिक मेकअपमुळे त्यांना ओळखणेही कठीण झाले आहे.
आज एक अत्यंत यशस्वी कलाकार म्हणून ओळखले जाणारे फैसल यांचा हा प्रवास मात्र अनेक संघर्षांनी भरलेला आहे. उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथील फैसल यांनी अभिनेता बनण्याचे स्वप्न घेऊन वयाच्या 22व्या वर्षी मुंबईची वाट धरली होती. मात्र, मायानगरीत आल्यानंतर त्यांना कठीण परिस्थितीचा सामना करावा लागला.
या शहराने त्यांना आयुष्याचे वास्तव दाखवलं, असं एका जुन्या मुलाखतीत फैसल यांनी मुंबईतील सुरुवातीच्या दिवसांबद्दल सांगितलं होतं . अभिनय क्षेत्रात स्थिरावणे सोपं नव्हतं. आर्थिक अडचणींमुळे काही काळ त्यांना अभिनय बाजूला ठेवून नोकरीचा शोध घ्यावा लागला.
संघर्षाच्या काळात त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. सुरुवातीला कुटुंबीय त्यांना आर्थिक मदत करत होतं, मात्र काही महिन्यांनंतर त्यांनी स्वतःहून पैसे मागणे बंद केलं. स्वतःच्या मेहनतीवर उभे राहण्याचा त्यांनी निर्णय घेतला. फैसल यांनी त्यांच्या संघर्षाच्या दिवसांची आठवण सांगताना म्हटलं होतं की, अनेकदा त्यांना रेल्वे स्थानकावर केवळ 10 रुपयांमध्ये रात्र काढावी लागली होती. मात्र, या कठीण अनुभवांनीच त्यांना अधिक मजबूत बनवले आणि पुढे जाण्याची प्रेरणा दिली.
‘पंचायत’ या सीरिजने फैसल मलिक यांच्या करिअरला मोठी ओळख मिळवून दिली. प्रह्लाद पांडे या भूमिकेतील त्यांच्या साध्या पण प्रभावी अभिनयाचे प्रेक्षकांनी भरभरून कौतुक केले. आता ‘रामायण’सारख्या भव्य चित्रपटात कुंभकर्णाची भूमिका साकारत फैसल आपल्या करिअरमधील आणखी एक महत्त्वाचा टप्पा गाठण्यासाठी सज्ज झाले आहेत.




Leave a Reply