
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात अनेक भोंदू बाबांचे कारनामे समोर येत आहेत. त्यातच आता दैवी शक्ती आणि अध्यात्म या शब्दांचा वापर करून आणखी एका भोंदू बाबाने पीडित तरुणीचे आयुष्य उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. नाशिकच्या निफाड तालुक्यातील धरणगाव खडक येथील रहिवासी महेशगिरी उर्फ महेश दिलीप काकडे याने एका तरुणीला मानसिक त्रासातून मुक्त करण्याचे आमिष दाखवत तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या (ANIS) हस्तक्षेपामुळे हा सर्व प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी लासलगाव पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.
नेमकं काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी गेल्या काही काळापासून गंभीर मानसिक आणि कौटुंबिक समस्यांनी त्रस्त होती. तिचे पालक तिला उपचारासाठी आरोपी महेश काकडे याच्याकडे घेऊन गेले होते. यावेळी आरोपीने तिच्यावर भूतबाधा झाल्याचा खोटा दावा करत कुटुंबाच्या मनात भीती निर्माण केली. हा त्रास दूर करण्यासाठी तिला दर गुरुवारी पूजेसाठी आणि नमाजासाठी बोलावण्यास सुरुवात केली. श्रद्धेपोटी पालकांनीही त्याच्यावर विश्वास ठेवला. ज्याचा फायदा घेत त्याने तरुणीशी जवळीक साधली.
यानंतर २३ ऑगस्ट २०२४ रोजी आरोपीने पीडितेला पूजेच्या बहाण्याने नाशिकमधील पंचवटी परिसरात बोलावले. तिथून त्याने तिला आपल्या गाडीत बसवून त्र्यंबकेश्वर रोडवरील एका खासगी लॉजवर नेले. तिथे तरुणीने विरोध करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याने आपल्या गळ्यातील रुद्राक्ष दाखवत तिला धमकावले. माझ्याकडे प्रचंड दैवी शक्ती आहे, तू माझ्या तावडीतून सुटू शकत नाहीस, असे म्हणत त्याने तिच्यावर जबरदस्तीने बलात्कार केला. एवढ्यावरच न थांबता, त्याने पीडितेचे नग्न फोटो आणि व्हिडीओ काढून तिला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली.
या घटनेनंतर पीडितेने पोलिसांत जाण्याची भाषा केली असता, आरोपीने तिला जीवे मारण्याची धमकी दिली. मीच कायदा आहे, असे म्हणत त्याने पीडितेचा मोबाईल हिसकावून घेतला. त्यातील स्वतःला अडचणीत आणणारे सर्व मेसेज आणि फोटो डिलीट करून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. यामुळे पीडित तरुणी प्रचंड दहशतीखाली होती.
‘अंनिस’च्या पाठपुराव्याला यश
अनेक दिवस भीतीच्या छायेत राहिल्यानंतर पीडितेने अखेर अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांशी संपर्क साधला. समितीने तिला कायदेशीर आणि मानसिक आधार दिला. त्यानंतर लासलगाव पोलीस ठाण्यात आरोपी महेश काकडे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी तत्परतेने कारवाई करत आरोपीला ताब्यात घेतले. या घटनेनंतर पोलिसांनी नागरिकांना अशा भोंदू बाबांच्या जाळ्यात अडकू नये, असे आवाहन केले आहे.
Leave a Reply