
बॉलिवूडच्या इतिहासातील सर्वाधिक लोकप्रिय चित्रपटांमध्ये ‘शोले’चा समावेश होतो. 15 ऑगस्ट 1975 रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने जय-वीरूची मैत्री, गब्बर सिंहचा दरारा आणि दमदार अॅक्शनच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केलं.
मात्र, या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान घडलेली एक धक्कादायक घटना अनेक वर्षांनी समोर आली होती. चित्रपटाचे दिग्दर्शक रमेश सिप्पी यांना ‘शोले’मधील अॅक्शन सीन्स शक्य तितके वास्तववादी दाखवायचे होते.
शूटिंगदरम्यान क्लायमॅक्सच्या एका सीनचे चित्रीकरण सुरू होते. या सीनमध्ये अमिताभ बच्चन यांचे ‘जय’ हे पात्र डोंगराच्या माथ्यावर उभे असते, तर धर्मेंद्र यांचे ‘वीरू’ हे पात्र बंदुकीत गोळ्या भरण्याचा सीन करत होते.
शूटिंगदरम्यान एका छोट्याशा चुकीमुळे या सीनचे अनेक रीटेक घ्यावे लागले. धर्मेंद्र यांच्या हातातून वारंवार गोळ्या खाली पडत होत्या. सलग काही टेक खराब झाल्यामुळे धर्मेंद्र चांगलेच वैतागले होते. त्याच संतापाच्या भरात त्यांनी बंदुकीत खऱ्या काडतुसाचा वापर केला आणि रागाच्या भरात ट्रिगर दाबला.
गोळी हवेत झाडली गेली आणि ती थेट अमिताभ बच्चन उभे असलेल्या दिशेने गेली. अमिताभ यांच्या म्हणण्यानुसार, गोळी त्यांच्या कानाजवळून वेगाने गेल्याचा आवाज त्यांना ऐकू आला. त्या क्षणी सेटवर एकच खळबळ उडाली होती. थोडक्यात अमिताभ बच्चन यांचा जीव वाचला आणि एक मोठा अनर्थ टळला.




Leave a Reply