
भारतात लवकरच 10 आणि 20 रुपयांच्या पॉलिमर (प्लास्टिक) नोटा चलनात येण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारने रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या पायलट प्रोजेक्टला मंजुरी दिली असून, सुरुवातीला प्रत्येकी 100 कोटी नोटांची चाचणी केली जाणार आहे. या चाचणीच्या निकालानंतर पुढील निर्णय घेतला जाईल.
केंद्रीय वित्त राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी लोकसभेत लेखी उत्तराद्वारे ही माहिती दिली. त्यांच्या म्हणण्यानुसार, आरबीआयने केंद्रीय संचालक मंडळाच्या शिफारशीनंतर सरकारकडे प्रस्ताव पाठवला होता आणि त्याला मंजुरी मिळाली आहे.
या प्रकल्पाचा उद्देश भारतातील विविध हवामान आणि वापराच्या परिस्थितीत पॉलिमर नोटा किती टिकाऊ आणि उपयुक्त ठरतात, याची तपासणी करणे हा आहे. चाचणी यशस्वी ठरल्यास भविष्यात 10 आणि 20 रुपयांच्या पॉलिमर नोटा नियमितपणे जारी करण्याबाबत निर्णय घेतला जाऊ शकतो.
रिझर्व्ह बँक अधिनियम, 1934 च्या कलम 25 अंतर्गत हा प्रस्ताव सरकारकडे पाठवण्यात आला होता. आता या फील्ड ट्रायलकडे बँकिंग क्षेत्रासह सर्वसामान्य नागरिकांचेही लक्ष लागले आहे.
Leave a Reply