
गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख त्यांच्या आगामी चित्रपटामुळे आणि एसटीच्या जाहिरातीमुळे सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आहेत. अशातच आता रितेश देशमुखने 'राजा शिवाजी' चित्रपटासंदर्भातील सलमान खानचा एक किस्सा सांगितला आहे.
अभिनेता रितेश देशमुखचा बहुचर्चित ऐतिहासिक चित्रपट 'राजा शिवाजी' येत्या 1 मे रोजी जगभरात प्रदर्शित होणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्यगाथेवर आधारित असलेल्या या भव्य चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. विशेष म्हणजे या चित्रपटात बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानचा कॅमिओ आहे.
गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर सलमान खान या सिनेमात झळकणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. यावर आता शिक्कामोर्तब करताना रितेश देशमुखने ‘लोकसत्ता ऑनलाइन’शी बोलताना एक खास किस्सा सांगितला. तो म्हणाला की, मी ‘लय भारी’ करत होतो तेव्हाही सलमान भाऊ आमच्यासोबत होता.
त्यानंतर ‘वेड’ चित्रपटासाठी एका गाण्यात त्याची गरज होती. मी त्याला फोन केला आणि त्याने क्षणाचाही विलंब न लावता होकार दिला. दोन दिवसांचं शूट असतानाही त्याने लगेच ‘डन’ म्हटलं.
यावेळी मात्र वेगळीच घटना घडल्याचं रितेश यांनी सांगितलं. 'मी ‘राजा शिवाजी’साठी त्याच्याकडे गेलो नव्हतो. आम्ही एकत्र भेटलो असताना त्यानेच मला विचारलं की, चित्रपट कधी सुरू होतोय? मी जानेवारीत शूटिंग सुरू करणार असल्याचं सांगितलं. त्यावर सलमानने थेट विचारलं ‘माझी भूमिका कोणती असेल?’ मी काही क्षण त्याच्या कडे बघतच राहिलो. कारण तो स्वतः भूमिका विचारेल असं मला वाटलंच नव्हतं.
तो पुढे म्हणाला ‘माझ्याशिवाय तुम्ही चित्रपट करूच शकत नाही, मी असायलाच पाहिजे.’ त्याच्या या आपुलकीमुळे मी भारावून गेलो, असं रितेशने सांगितलं. या चित्रपटात सलमान खान एका खास आणि लक्षवेधी भूमिकेत दिसणार आहे असं रितेश देशमुखने स्पष्ट केलं आहे.





Leave a Reply