
राजकारणात काहीही घडू शकतं. जे वरुन दिसतं तसं नसतं. आतली परिस्थिती वेगळी असते. हेच आजच्या बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावच्या सरपंचपदाच्या निवडणूक निकालातून दिसून आलं. दीड वर्षांपूर्वी 9 डिसेंबर 2024 रोजी मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची अत्यंत निर्घृण हत्या झाली होती. मारेकऱ्यांची क्रूरतेचं टोक गाठलं होतं. यांना माणसं म्हणावं का? असा प्रश्न सर्वांना पडलेला. या प्रकरणात वाल्मिक कराड आणि काही जण आजही तुरुंगात आहेत. न्यायालयात या प्रकरणी खटला सुरु आहे. गुन्ह्याची क्रूरता पाहता संतोष देशमुख यांना न्याय मिळवून देण्यासाठी बीडसह संपूर्ण राज्यभरात मोर्चे निघाले होते. त्यातून बीडच्या राजकारणातील अनेक गोष्टी बाहेर आल्या. अख्खच्या अख्ख मस्साजोग गाव संतोष देशमुखांना न्याय मिळाला पाहिजे म्हणून आंदोलनाला बसायचं. गावकऱ्यांनी भक्कपणे संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला साथ दिली.
पण मस्साजोग गावच्या सरपंच पदाच्या पोटनिवडणुकीत मात्र संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला गावकऱ्यांनी साथ दिली नाही. परिणामी आज दिवंगत संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी संतोष देशमुख यांचा सरपंच पदाच्या निवडणुकीत पराभव झाला. स्वरुपानंद देशमुख यांनी या निवडणुकीत बाजी मारली. खरंतर जे गाव संतोष देशमुख कुटुंबाच्या पाठिशी उभं राहिलं, ते मतपेटीतून सोबत का नव्हते? हा प्रश्न निर्माण झाला आहे. वहिनीच्या पराभवाला काय कारणं ठरली त्यावर धनंजय देशमुख बोलले आहेत.
ते त्यांचं मत होतं
“पराभवाची अनेक कारणं आहेत. आमचा भाऊ गेल्यानंतर गावातील अनेकांना वाटायचं मला हे काम मिळावं. पण माझ्या हातात काही नव्हतं. न्यायाच्या लढाईत आम्ही असल्याने गावाशी असलेली नाळ तुटत गेली. भाऊ गेल्यानंतर मला ती टिकवून ठेवता आली नाही. मी पैसे वाटप केल्याचा आरोप कोणावरही केला नाही.त्यांनी जो राजकारण केल्याचा आरोप केला ते त्यांचं मत होतं” असं धनंजय देशमुख म्हणाले.
स्वरूपानंद देशमुख यांनी संतोष देशमुख कुटुंबाची घेतली भेट
दरम्यान या निवडणुकीत विजयी ठरलेले नवे सरपंच स्वरूपानंद देशमुख निकाल जाहिर झाल्यानंतर स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या कुटुंबाची भेट घेण्यासाठी त्यांच्या घरी दाखल झाले आहेत. दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख यांचा पराभव झाल्यानंतर त्यांची भेट घेण्यासाठी ते पोहोचले आहेत. संतोष देशमुख यांच्या न्यायाच्या लढ्यात आपण यापुढे देखील सोबत राहणार असल्याची प्रतिक्रिया स्वरूपानंद यांनी दिली होती. स्वरुपानंद देशमुख यांनी संतोष देशमुख यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. यावेळी धनंजय देशमुख उपस्थित होते. त्यांनी स्वरूपानंद देशमुख यांना विजयासाठी शुभेच्छा दिल्या.
Leave a Reply