
सातारा येथील मान्याची वाडी ग्रामपंचायतीने गायी-म्हशींसाठी अनोखे ब्युटी पार्लर उघडले आहे. गावातील गायी म्हशींना नदी ओढ्यावर न धुता गावातच शॉवर खाली धुण्याची आणि त्यांच्या अंगावरील अनावश्यक केस काढण्याची सोय करण्यात आली आहे. राज्यातील गावागावात असणाऱ्या लाखो पाळीव जनावरांना उघड्यावर नदी, तलाव आणि नाल्यात धुतल्याने पाण्याचे होणारे प्रदूषण रोखण्याच्या दृष्टीने हा आशादायक प्रयोग म्हटला जात आहे.
ग्रामविकासाच्या दृष्टीने विविध प्रयोग करण्यात देशात अग्रेसर असणाऱ्या राष्ट्रपतींनी गौरवलेल्या महाराष्ट्रासह देशात विविध 82 पुरस्कार मिळालेल्या सातारा – पाटण येथील मान्याची वाडी ग्रांमपंचायतीने हा उपक्रम सुरु केला आहे.
गावातील पाळीव जनावरांसाठी या ग्रामपंचायतीने अत्याधुनिक स्नानगृह उभारले आहे. या स्नानगृहात जनावरांसाठी शॉवर, स्वच्छ पाण्याची सोय, गीत संगिताच्या तालावर जनावरांना आंघोळ घातली जाते. जनावरांच्या अंगावरील अनावश्यक केस या ठिकाणी काढले जातात. त्याच बरोबर घनकचरा व्यवस्थापन आणि सांडपाण्यावर प्रक्रिया अशी सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
आंघोळीनंतर निघणारं पाणी वाया न घालवता त्यावर प्रक्रिया करून ते परसबागेसाठी वापरले जाते. यामुळे एकीकडे जनावरांचे आरोग्य सुधारते, तर दुसरीकडे पर्यावरण संरक्षणालाही मोठी चालना मिळत आहे.
ग्रामीण भागात जनावरांमुळे होणाऱ्या प्रदूषणावर असा ठोस उपाय करणारा हा महाराष्ट्रातील पहिलाच उपक्रम ठरला आहे. मान्याचीवाडी ग्रामपंचायतीचा हा प्रयोग आता राज्यातील इतर गावांसाठीही प्रेरणादायी ठरणार आहे. मान्याची वाडीचे सरपंच रविंद्र माने यांच्याशी टीव्ही ९ मराठी चॅलनचे प्रतिनिधी दिनकर थोरात यांनी संवाद साधला.




Leave a Reply