
आई आणि मुलाचे नाते हे जगातील सर्वांत पवित्र आणि भावनिक नाते मानले जाते. या नात्यावर हिंदी चित्रपटसृष्टीत अनेक अविस्मरणीय गाणी तयार झाली असली, तरी 1968 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘राजा और रंक’ या चित्रपटातील गाणं आजही प्रेक्षकांच्या मनाला स्पर्श करते.
‘तू कितनी भोली है, तू कितनी नादान है’ या गाण्याला स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी आपल्या भावपूर्ण आवाजाने अजरामर केले आहे. गीतकार आनंद बक्षी यांनी आईच्या प्रेम, माया, काळजी आणि मुलासाठीच्या शुभेच्छा अत्यंत साध्या पण हृदयस्पर्शी शब्दांत व्यक्त केल्या आहेत.
तर लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांच्या सुरेल संगीतामुळे हे गाणं अधिक प्रभावी बनले आहे. ‘राजा और रंक’ या चित्रपटात संजीव कुमार, निरूपा रॉय आणि महेश कोठारे यांच्या प्रमुख भूमिका होत्या.
दोन वेगवेगळ्या सामाजिक स्तरातील मुलांच्या आयुष्याभोवती फिरणारी ही कथा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. आजही मदर्स डे, शाळांमधील सांस्कृतिक कार्यक्रम तसेच कौटुंबिक समारंभांमध्ये हे गाणं आवर्जून वाजवले जाते.
रेडिओपासून सोशल मीडियापर्यंत या गाण्याची लोकप्रियता कायम आहे. आईच्या निःस्वार्थ प्रेमाचा आणि मुलाबद्दलच्या तिच्या काळजीचा भावनिक आविष्कार असल्यामुळे हे गीत 58 वर्षांनंतरही रसिकांच्या हृदयात अढळ स्थान राखून आहे.




Leave a Reply