
महाराष्ट्र राज्य सहकारी संघाच्या इमारतीवर कथित बेकायदेशीर ताबा घेतल्याप्रकरणी उत्तम शिंदे यांच्याविरोधात पुण्यातील बंड गार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणामुळे सहकार क्षेत्रात खळबळ उडाली आहे. पुण्यातील बी. जे. रोड परिसरातील महाराष्ट्र राज्य सहकारी संघाच्या मालकीच्या इमारतीचा भाडेकरार संपल्यानंतरही संबंधित जागेचा ताबा संघाकडे परत देण्यात आला नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणात उत्तम शिंदे यांनी इमारतीवर बेकायदेशीर ताबा ठेवल्याचा दावा करण्यात आला आहे.
या संदर्भात महाराष्ट्र राज्य सहकारी संघाच्या वतीने प्रवीणकुमार मुळक यांनी बंड गार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. फिर्यादीच्या तक्रारीनुसार, भाडेकराराची मुदत संपल्यानंतरही इमारत रिकामी करून संघाच्या ताब्यात देण्यात आली नसल्याने कायदेशीर कारवाईची मागणी करण्यात आली होती.
तक्रारीची दखल घेत बंड गार्डन पोलिसांनी उत्तम शिंदे यांच्याविरोधात गुन्हा नोंदवला असून, प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. या प्रकरणातील सर्व बाबींची चौकशी करून आवश्यक ती कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.
Leave a Reply