
दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री त्रिशा कृष्णन गेल्या काही दिवसांपासून तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चत आहे. तमिळनाडूचे मुख्यमंत्री आणि अभिनेते थलपती विजय यांच्यासोबतच्या कथित नातेसंबंधांमुळे त्रिशाने सोशल मीडियावर सर्वांचं लक्ष वेधलंय. अशातच तिने इन्स्टाग्रामवर काही फोटो पोस्ट लिहिले आहेत. या फोटोंपेक्षा त्याच्या कॅप्शनची नेटकऱ्यांमध्ये चर्चा आहे.
'माझ्या 'मॅजिकल' (जादुई) मे महिन्याने म्हटलंय की, आणखी एक विजय.. फक्त देवाच्या गोष्टी', असं कॅप्शन तिने या फोटोंना दिलं आहे. त्रिशाने पोस्ट केलेले हे सर्व फोटो तिच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'करुप्पू' या चित्रपटाच्या सेटवरील आहेत. या कॅप्शनमध्ये त्रिशाने नजर लागू नये म्हणून 'एव्हिल आय'चा सिम्बॉलसुद्धा पोस्ट केला आहे.
सूर्या आणि त्रिशाची मुख्य भूमिका असलेला 'करुप्पू' हा चित्रपट नुकताच थिएटरमध्ये प्रदर्शित झाला असून अवघ्या तीन दिवसांत या चित्रपटाने कमाईचा 100 कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. परंतु त्रिशाने ज्याप्रकारे 'आणखी एक विजय' असा उल्लेख केला आहे, त्यावरून पुन्हा नेटकरी याचं कनेक्शन थलपती विजय यांच्याशी जोडत आहेत.
मे महिन्यातच तमिळनाडू विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला होता. यात थलपती विजय यांच्या टीव्हीके पक्षाने मोठं यश मिळवलं होतं. तर निकालाच्या दिवशीच म्हणजेच 4 मे रोजी त्रिशाचा वाढदिवससुद्धा होता. त्यानंतर 10 मे रोजी विजय यांनी तमिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. या शपथविधी सोहळ्यात त्रिशाने अत्यंत पारंपरिक अंदाजात हजेरी लावली होती.
मे महिना हा त्रिशासाठी खूपच खास ठरला आहे, हे तिच्या कॅप्शनवरून सहज लक्षात येत आहे. त्रिशाच्या पोस्टवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. 'त्रिशाला या कॅप्शनमधून काय म्हणायचं आहे, ते आम्हाला समजलंय', अशा प्रतिक्रिया चाहत्यांनी दिल्या आहेत.





Leave a Reply