• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

मुंबई- पुणे एक्सप्रेसवरील मिसिंग लिंकचे काम पूर्ण, १ मेला उद्घाटन, प्रवासाचा वेळ किती कमी होणार ? वाचा

April 26, 2026 by admin Leave a Comment


मुंबई-पुणे द्रुतगती मार्गातील महत्वाच्या ‘मिसिंग लिंक’ जोड मार्गाचे ९९ टक्के काम पूर्ण झाले असून येत्या १ मे रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या मार्गाचे उद्घाटन करण्यात येणार आहे. या प्रकल्पाच्या नव्या जोडमार्गाने प्रवासाचा वेळ अर्ध्या तासाने कमी होणार असून घाटातील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणावर कमी होऊन प्रवास अधिक वेगवान, सुरक्षित आणि सिग्नल-फ्री होणार आहे. त्यामुळे एक प्रकारे अर्थव्यवस्थेलाही चालना मिळणार असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

उपमुख्यमंत्री शिंदे यांनी रविवारी प्रत्यक्ष स्थळी भेट देऊन महत्वाकांक्षी ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाची पाहणी केली. “आपण स्वतः येथे येऊन कामाची गुणवत्ता तपासली असून कामे समाधानकारक झाली आहेत. उर्वरित किरकोळ कामे पुढील काही दिवसांत पूर्ण होतील. वेळेत आणि उच्च दर्जाने काम पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश अधिकाऱ्यांना दिल्याचेही त्यांनी सांगितले.

सुमारे १०.५ किलोमीटर लांबीच्या या प्रकल्पात दोन भव्य बोगदे, उंच व्हायाडक्ट आणि टायगर व्हॅलीवरील सुमारे १८२ मीटर उंच केबल-स्टेड पूल उभारण्यात आला आहे. सुमारे २३.७५ मीटर रुंद बोगदा हा जगातील सर्वात रुंद बोगद्यांपैकी एक मानला जातो. ७० किमी प्रतितास वेगाने वाहणारे वारे, मुसळधार पाऊस आणि कठीण भौगोलिक परिस्थितीत हा प्रकल्प यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आला आहे. लोणावळा तलावाच्या १८२ मीटर खालून हा रस्ता जाणार आहे, हा प्रकल्प पूर्ण करणे म्हणजे एक आव्हान होते मात्र महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने ( MSRDC ) हे मोठे आव्हान स्वीकारून प्रकल्प पूर्णत्वास नेल्याचे शिंदे यांनी नमूद केले.

मिसिंग लिंक सुरू झाल्यानंतर घाटातील धोकादायक वळणे आणि वाहतूक पूर्णपणे बायपास होणार असून प्रवासाचा वेळ सुमारे २० ते ३० मिनिटांनी कमी होईल. “या प्रकल्पामुळे घाटातील अपघात जवळपास शून्यावर येतील,” असा ठाम दावा शिंदे यांनी केला. यामुळे इंधनाची बचत, वेळेची बचत आणि प्रदूषणात लक्षणीय घट होणार आहे.

हलकी वाहने आणि बसना प्राधान्य

या प्रकल्पामुळे मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाचे अंतर सुमारे ६ किलोमीटरने कमी होणार आहे. सुरुवातीच्या टप्प्यात हलकी वाहने आणि बसना प्राधान्य देण्यात येणार असून त्यामुळे घाटातील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होईल. मिसिंग लिंक प्रकल्पामुळे टोलमध्ये कोणतीही वाढ होणार नाही. खालापूर टोल नाक्यावरही सध्या कोणतीही वाढ प्रस्तावित नसल्याची एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

सुमारे ६७०० कोटी रुपयांच्या या प्रकल्पाला २०१९ साली मंजुरी देण्यात आली होती. त्या वेळी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते, तर आता त्यांच्या उपस्थितीतच या प्रकल्पाचे लोकार्पण होणार आहे.

मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग हा देशातील पहिला ‘ऍक्सेस कंट्रोल’ मार्ग ठरला होता. या मार्गामुळे आयटी, सेवा क्षेत्र, उद्योग आणि रिअल इस्टेटमध्ये मोठी वाढ झाली. आता ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पामुळे या मार्गाची कार्यक्षमता आणखी वाढणार आहे.

बोगद्यांना सजवले

तसेच या प्रकल्पामुळे लोहगड, विसापूर किल्ले आणि कार्ला लेणी यांसारख्या पर्यटन स्थळांना अधिक चांगली कनेक्टिव्हिटी मिळणार असून पर्यटनालाही चालना मिळेल. यासाठीच या प्रकल्पातील बोगद्यांना देखील गडकिल्ले आणि कार्ला लेण्याच्या प्रतीकृतीप्रमाणे सजवण्यात आले असल्याचे शिंदे यांनी यावेळी स्पष्ट केले. कामाचा दर्जा उत्तम ठेवून ही शिल्प खराब होऊ नयेत याची पुरेशी खबरदारी घेण्यात आली असल्याचे यावेळी शिंदे यांनी स्पष्ट केले.

पुढील काळात समृद्धी महामार्ग, कोकण कोस्टल रोड, वसई-विरार मल्टीमोडल कॉरिडॉर यांसारख्या प्रकल्पांना जोडून राज्यात ऍक्सेस कंट्रोल रस्त्यांचे जाळे उभारण्यावर सरकारचा भर असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. “महाराष्ट्रातील कोणत्याही कोपऱ्यातून दुसऱ्या कोपऱ्यात ७ ते ८ तासांत पोहोचता येईल, अशी सक्षम दळणवळण व्यवस्था उभारत आहोत,” असे त्यांनी सांगितले.

यावेळी खासदार श्रीरंग बारणे, माजी नगरसेवक आबासाहेब बागुल, एमएसआरडीसीचे व्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार गायकवाड आणि एमएसआरडीसी, एफ्कॉन आणि नवयुग कंपनीचे सर्व प्रमुख अभियंते आणि कर्मचारी उपस्थित होते.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • एसटीत ग्रॅज्युईटी घोटाळा,व्याजापायी अडीच कोटींचा भुर्दंड, ६३ अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी
  • बागेश्वर बाबांचं छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य; संभाजीराजेंचा संताप, म्हणाले अशा भोंदू बाबांना…
  • तुम्ही जर एका बापाचे असाल तर आधी मला रोखा, तुम्ही म्हणाल तिथे… माजी सरन्यायाधीशाच्या भावानेच श्याम मानव यांना ललकारले
  • IPL 2026, KKR vs LSG: कोलकात्याचा लखनौवर सुपर विजय, असं घडलं या सामन्यात
  • Beach वर नुसरत जहाँ हीचा ग्लॅमरस अंदाज, पाण्यात अभिनेत्रीचा दिसला सिझलिंग लूक

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in