
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी रात्री महिला आरक्षण विधेयकाच्या मुद्द्यावरुन देशवासियांना संबोधित केले. या भाषणात त्यांनी काँग्रेस पक्षावर जोरदार टीका केली. या टीकेला काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी तीव्र प्रत्युत्तर दिले आहे.
नाना पटोले म्हणाले, “पंतप्रधान जेव्हा देशाला संबोधित करतात, तेव्हा ते देशहिताच्या मुद्द्यावर किंवा संकटाच्या वेळी बोलतात, असे मला आजवर वाटत होते. पण २०१४ पासून आजपर्यंतच्या प्रत्येक भाषणात नरेंद्र मोदी यांनी १५० हून अधिक वेळा काँग्रेस पक्षाचे नाव घेतले आहे. ५६ इंच छाती असणाऱ्या पंतप्रधानांना काँग्रेसची एवढी भीती का वाटते?” असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
पटोले पुढे म्हणाले, “मोदी बोलत असताना मी मोबाईलवर पाहत होतो. अनेक लोक त्यांच्यावर ‘फेकू’ आणि ‘मी बोलू शकत नाही’ अशा शब्दांत टीका करत होते.” ते म्हणाले, “देशाचा पंतप्रधान वारंवार खोटे बोलत असल्याने जनतेचा त्यांच्यावरचा विश्वास उडाला आहे. २०२३ मध्ये महिला आरक्षण विधेयक आणले तेव्हा सर्व विरोधी पक्षांनी त्याला पाठिंबा दिला आणि ते मंजूरही झाले. त्यावेळी पंतप्रधान म्हणाले होते की, २०२४ मध्ये जनगणना करून मतदारसंघांची पुनर्रचना केली जाईल. आता २०२६ साल सुरू झाले तरी जनगणनेचा विषय अद्याप प्रलंबित आहे.”
नाना पटोले यांनी आरोप केला की, “राहुल गांधी यांच्या दबावामुळे जनगणना करण्याची तयारी दाखवावी लागली. पण सुरू झालेल्या जनगणनेत ओबीसीसाठी वेगळा स्तंभ ठेवण्यात आला नाही. यावरून पंतप्रधान बहुजन समाजाच्या विरोधात आहेत, हे स्पष्ट दिसून येते. एकीकडे नारी शक्तीला नमन करायचे आणि दुसरीकडे मणिपूरमध्ये महिलांचा अपमान झाला तरी पंतप्रधान यावर बोलायला तयार नाहीत.”
लोकसभा निवडणुकीत भाजपने महिलांना केवळ १० टक्के तिकिटे दिली, तर काँग्रेसने १३ टक्के महिलांना तिकिटे दिली होती. “भाजपला महिलांचा सन्मान करायचा नाही, आम्ही मात्र महिलांचा सन्मान केला आहे,” असा दावा नाना पटोले यांनी केला.
नाना पटोले यांनी तीव्र शब्दांत टीका करताना म्हटले, “हे नारीशक्तीला नमन नव्हते, तर खुर्चीसाठी नमन होते. यांचा खरा पक्ष भाजप नव्हे, तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आहे. टेलिप्रॉम्प्टरसमोर केलेले हे भाषण देशातील महिलांसाठी नव्हते, तर सत्ता टिकवण्यासाठी आणि मनुवादी व्यवस्था रुजवण्याचा प्रयत्न होता. बहुजन, दलित आणि सर्व घटकांसाठी या विधेयकात काय तरतूद आहे, हे स्पष्ट सांगा. आम्ही समर्थन करू. राहुल गांधी यांनी नेहमी बहुजनांना न्याय मिळावा यासाठी भूमिका घेतली आहे. या लोकांना देश कधीही माफ करणार नाही. बहुजन समाजातील महिलांसह सर्वजण यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाहीत. तुम्ही कितीही नौटंकी केली तरी तुमचा नकली चेहरा जनतेसमोर आला आहे.”
Leave a Reply