• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

माझ्याकडून मोठी चूक झालेली..; चोराच्या चाकूहल्ल्याच्या घटनेवर अखेर सैफची कबुली

June 28, 2026 by admin Leave a Comment


जानेवारी 2025 मध्ये अभिनेता सैफ अली खानवर त्याच्या मुंबईतील घरात घुसून एका चोराने चाकूहल्ला केला होता. या हल्ल्यात सैफ गंभीर जखमी झाला होता. या घटनेविषयी सैफने विविध मुलाखतींमध्ये बरंच काही सांगितलं होतं. मात्र आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सैफने त्याच्याकडून एक चूक झाल्याचं कबूल केलं. त्याचप्रमाणे हल्ल्याच्या रात्री नेमकं काय घडलं होतं, याचा तपशील सांगितला आहे. सैफ आणि करीनाच्या घरात एक चोर बाथरुमच्या खिडकीतून घुसला होता. सैफची मुलं तैमुर आणि जहांगीरच्या खोलीत तो हातात चाकू घेऊन शिरला होता. एका नॅनीने त्याला पाहिलं होतं आणि लगेच तिने वरच्या खोलीत झोपलेल्या सैफ आणि करीना यांना याबद्दलची माहिती दिली.

नेमकं काय घडलं होतं?

‘मोजो स्टोरी’ला दिलेल्या मुलाखतीत सैफने सांगितलं, “नॅनीने सांगताच मी मुलांच्या खोलीत गेलो, तेव्हा समोर एक माणूस हातात चाकू घेऊन उभा होता. त्याने आधीच नॅनी आणि मुलावर छोटासा वार केला होता. जर मी लाइट लावून त्याला विचारलं असतं की, तू कुठे आहेस आणि काय करतोय हे तुला माहीत आहे का? तर मी त्याला कदाचित सगळं समजावून सांगू शकलो असतो. पण त्या क्षणी मला काय झालं होतं, हे मलाही माहीत नाही. मी त्याच्यावर थेट झडप घातली आणि आमच्यात झटापट सुरू झाली. त्याने बेभानपणे माझ्यावर चाकूने वार केले. माझ्या मदतीला घरातली नेपाळी मोलकरीण आली. पूर्ण ताकदीने तिने त्याला माझ्यापासून दूर ढकललं. खरं सांगायचं तर, तिने माझा जीव वाचवला.”

तैमूरसोबत रुग्णालयात पोहोचलेला सैफ

“या झटापटीत मी आमच्या घरात भिंतीवर टांगलेल्या तलवारीच काढून लढणार होतो. पण मोलकरीणीने त्या चोराला खोलीत कोंडून टाकलं आणि ज्या खिडकीतून तो आत शिरला होता, तिथूनच तो पळाला. मी रक्तबंबाळ झालो होतो आणि त्याक्षणी मी मरेन की काय, असंच वाटलं होतं. मी आयुष्य पुरेपूर जगलोय, मला आता फक्त माझ्या मुलांना शेवटचं पहायचं होतं, त्यांचा हात धरायचा होता आणि निरोप घ्यायचा होता, असे विचार मनात येत होते. पण थोड्या वेळाने मी शुद्धीवर येऊन विचार करू लागलो. स्वत:लाच समजावून उठलो की. नाही, अजून ती वेळ आलेली नाही. रुग्णालयात जाताना तैमूर माझ्यासोबत होता. तो मला खूप धीर देत होता. त्याने मला विचारलं, बाबा तू मरणार आहेस का? मी त्याला म्हणालो, नाही. माझ्या पाठीत काहीतरी खुपसलं आहे आणि मला खूप वेदना जाणवत आहेत. पण मी मरणार नाही, तू माझ्यासोबत ये”, असं सैफने पुढे सांगितलं.

चोराला माफ करू इच्छितो सैफ

पहाटे 4 वाजताच्या सुमारास सैफ ऑटो-रिक्षाने तैमूरसोबत रुग्णालयात पोहोचला होता. या घटनेतून त्याचं कुटुंब बऱ्याच अंशी सावरल्याचं सैफने स्पष्ट केलं. तो पुढे म्हणाला, “जेहने मला तर एक प्लास्टिकची तलवार दिली आणि पुढच्या वेळी ती जवळ घेऊन झोपायला सांगितलं. आम्ही सर्वजण त्या घटनेतून खूप चांगल्या प्रकारे पुढे गेलो आहोत. पण मला त्या माणसाला माफ करायचं आहे. मला वाटतं की त्याने खूप मोठी चूक केली. कदाचित मी त्याच्यावर हल्ला करायला नको होता. मी त्याच्याशी बोलू शकलो असतो तर कदाचित ते प्रकरण तिथेच संपलं असतं. आता त्याला कदाचित अनेक वर्षे तुरुंगात काढावी लागतील. जर मला आता विचारलं, तर मी त्याला माफ करू इच्छितो. माझ्या मते श्रीमंत आणि गरीब यांच्यातील वाढत्या दरीचा हा परिणाम आहे. जे घडलं ते चुकीचंच होतं. पण मला वाटतं की तो कदाचित फक्त अन्न आणि पैशांच्या शोधात आला असेल. जर मी लाइट लावली असती आणि त्याला त्याच्या कृत्याची जाणीव करून दिली असती, तर तो कदाचित त्याने त्याची चूक कबूल केली असती.”



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • अमित साटम यांची मुंबई महापौर रितू तावडे आणि पालिका अधिकाऱ्यांना सक्त ताकीद
  • हिंदू धर्माची पताका अविरत फडकत राहणार-उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
  • महेंद्रसिंह धोनीची ऑफर चेन्नई सुपर किंग्सने नाकारली? पैसे कमी जास्त करताना बिनसलं! नेमकं काय घडलं?
  • महाराष्ट्रात साखरेचे दर वाढले; टंचाईच्या भीतीने खरेदीवर निर्बंध
  • आता चीन-पाकिस्तानची खैर नाही, युद्ध झालं तर… संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचा मोठा निर्णय

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in