
अभिनेता आमिर खानचा भाऊ फैजल खान याने त्याच्या कुटुंबासोबत सुरू असलेल्या दीर्घकाळापासूनच्या वादावर अत्यंत महत्त्वपूर्ण वक्तव्य केलं आहे. फैजलने उघडपणे त्याच्या चुका मान्य केल्या आणि त्याने आई, भाऊ आमिर खान, बहीण निखत आणि मेहुणा संतोष हेगडी यांची जाहीर माफी मागितली आहे. “रागाच्या आणि वेदनेच्या भरात मी सार्वजनिकरित्या ज्या काही गोष्टी बोललो, ती माझी सर्वांत मोठी चूक होती. आता मला काहीही सिद्ध करायचं नाही. मला फक्त माझ्या कुटुंबासोबत शांतता आणि नातेसंबंध टिकवून ठेवायचे आहेत”, असं तो म्हणाला.
आमिरप्रमाणेच त्याचा भाऊ फैजल खानलाही सिनेसृष्टीत स्वत:ची वेगळी ओळख बनवायची होती. पण नशिबाने त्याला साथ दिली नाही. फैजल आमिरसोबत ‘मेला’ या चित्रपटात दिसला होता. मात्र त्यानंतर तो त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळेच कायम चर्चेत राहिला. फैजलने आमिरवर अनेक धक्कादायक आरोप केले होते. आमिरने त्याला त्याच्या मुंबईतील घरात कोंडून ठेवलं होतं, असंही त्याने याआधी म्हटलं होतं. आता उज्ज्वल त्रिवेदी यांच्याशी बोलताना फैजल खान म्हणाला, “सर्वांत आधी मला माझ्या आईची माफी मागायची आहे. मला निखतची माफी मागायची आहे. मला संतोषची माफी मागायची आहे. मी आमिरचीही माफी मागतो. रागाच्या आणि दु:खाच्या भरात मी अशा अनेक गोष्टी बोललो, ज्या मला अजिबात बोलायला नको होत्या. माझ्याच कुटुंबाविरुद्ध जाहीरपणे बोलणं ही मोठी चूक होती. मी त्या गोष्टी जाहीरपणे बोलायला नको होत्या. मी त्यांच्यासोबत बसून बोलायला हवं होतं.”
आमिर, अम्माची माफी..
“आता कोणालाही चुकीचं सिद्ध करणं हे माझं ध्येय नाही. मला कोणतीही उत्तरं नको आहेत. मी बरोबर आहे आणि समोरची व्यक्ती चूक आहे, हे मला सिद्ध करायचं नाही. सत्यापेक्षा मला शांतता हवी आहे. ज्यांनी माझ्यासोबत काहीही केलं असेल, त्याला विसरण्याचा मी निर्णय घेतला आहे. नातेसंबंध जपणं अधिक महत्त्वाचं आहे. कुराण वाचल्यानंतर मला माझी चूक उमगली. त्यात कुटुंबाशी संबंध तोडू नयेत असा सल्ला दिला होता. त्यामुळे मी माझ्या कुटुंबाशी पुन्हा संपर्क साधण्याचा निर्णय घेतला आहे. मी बहीण निखतला फोन केला. माझ्या आईचा आवाज ऐकून माझे डोळे पाणावले. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी मी मुंबईला विमानाने आलो. मी आमिर आणि आईची भेट घेऊन त्यांची माफी मागितली. सर्वांनी मला प्रेमाने पुन्हा स्वीकारलं. अम्मा, निखत, संतोष आणि आमिर.. या सर्वांनी मला स्वीकारलं. आता आमच्या सर्व तक्रारी मिटल्या आहेत. तुमच्या कुटुंबातील कोणी चूक केली असेल तर उशीर करू नका. लगेच बोला किंवा माफ करा. आयुष्य खूप लहान आहे. कोणत्याही वादापेक्षा किंवा सत्य सिद्ध करण्यापेक्षा नातेसंबंध जपणं अधिक महत्त्वाचं आहे”, अशा शब्दांत तो व्यक्त झाला.
Leave a Reply