
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील परप्रांतीय हा चर्चेचा विषय ठरत आहेत. आता एका परप्रांतीय तरुणाने पुन्हा एकदा मराठी माणसाला डिवचलं आहे. यामुळे सोशल मीडियावर नवा वाद निर्माण झाला आहे. रेल्वे कॅन्टीन प्रकरणानंतर आता पुन्हा एकदा एका परप्रांतीय तरुणाने मराठी समाजावर वादग्रस्त टिप्पणी केली आहे. या तरुणाने केलेल्या वक्तव्यामुळे मराठी माणूस पेटून उठण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
काय आहे व्हिडीओ?
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका व्हिडिओमध्ये हा तरुण म्हणतो की, “मराठी माणूस स्वतःच्या बायकोला दुसऱ्यांच्या घरी भांडी घासायला पाठवतो, काम करायला लावतो आणि स्वतःला भाई समजतो.” त्याने पुढे असेही म्हटले की, “आमच्या बायका कधी भांडी घासताना पाहिल्यात का?” ही टिप्पणी मराठी समाजातील पुरुषांच्या प्रतिष्ठेला आणि संस्कृतीला लक्ष्य करणारी असल्याने ती अत्यंत आक्षेपार्ह ठरली आहे.
“भोजपुरी बोला, मगच जेवण मिळेल”
यापूर्वीही याच तरुणाने रेल्वे कॅन्टीनमध्ये “भोजपुरी बोला, मगच जेवण मिळेल” असे वक्तव्य करून वाद निर्माण केला होता. त्या घटनेनंतरही तो शांत बसला नसून आता मराठी माणसांवर थेट टीका करत आहे. यामुळे मराठी समाजात संतापाची लाट उसळण्याची शक्यता आहे.
मराठी माणूस स्वतःच्या कुटुंबाबद्दल आणि विशेषतः स्त्रियांबद्दल अत्यंत संवेदनशील असतो. अशा परिस्थितीत एखाद्या परप्रांतीय तरुणाने केलेले हे वक्तव्य केवळ व्यक्तिगत टीका न राहता सामाजिक आणि भाषिक भावना दुखावणारे ठरले आहे. अनेक मराठी युजर्सनी या तरुणाच्या व्हिडीओवर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करत तरुणाची निंदा केली आहे. काहींनी असेही म्हटले आहे की अशा प्रकारची टिप्पणी सामाजिक सलोख्याला बाधा आणणारी आहे.
मुंबई आणि महाराष्ट्रातील भाषिक मुद्दे वेळोवेळी चर्चेत येत असताना अशी वादग्रस्त वक्तव्ये वातावरण अधिक तणावपूर्ण बनवू शकतात. सोशल मीडियावर हा व्हिडिओ वेगाने पसरत असून त्यावरून चर्चा सुरू झाली आहे. व्हायरल व्हिडीओमधील परप्रांतीय तरुणाचे वक्तव्य मराठी माणसाला डिवचणारे आणि संताप निर्माण करणारे ठरले आहे.
Leave a Reply