
भारताच्या ऊर्जेच्या गरजा पूर्ण करण्यासाठी रशिया आवश्यक तेवढा कच्चा तेलपुरवठा करण्यास तयार असल्याचे रशियाचे भारतातील राजदूत डेनिस अलीपोव यांनी सांगितले. तेल व्यापारावर वाढवण्यात येणाऱ्या निर्बंधांवरही अलीपोव यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
निर्बंध आणि टॅरिफच्या माध्यमातून भारतावर दबाव आणण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप त्यांनी केला. रशिया आणि भारतातील ऊर्जा सहकार्य दोन्ही देशांच्या हिताचे असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. रॉयटर्सच्या रिपोर्टनुसार जुलै महिन्यात रशिया हा भारताचा कच्च्या तेलाचा सर्वात मोठा पुरवठादार ठरला.
भारताच्या एकूण कच्च्या तेल आयातीपैकी तब्बल 50.83 टक्के तेल हे रशियातून आलेले आहे. जुलैमध्ये भारताने दररोज सुमारे 24.7 लाख बॅरल रशियन कच्चे तेल आयात केले. गेल्या वर्षाच्या तुलनेत जुलैमध्ये रशियाकडून होणारी भारताची तेल आयात 62.4 टक्क्यांनी वाढली. त्यामुळे भारतासाठी रशिया हा ऊर्जा क्षेत्रातील अत्यंत महत्त्वाचा भागीदार बनला आहे.
डेनिस अलीपोव यांनी भारताला आपल्या ऊर्जेच्या गरजा आणि राष्ट्रीय हितांचा विचार करून निर्णय घ्यावा असेही अलीपोव यांनी संकेत दिले आहेत. भारताने यापूर्वीही दबावाला न झुकता स्वतःची भूमिका ठामपणे मांडल्याचे त्यांनी नमूद केले.
दरम्यान, रशियन तेलावरील निर्बंध आणि टॅरिफचा थेट परिणाम भारत-रशिया तेल व्यापारावर होऊ शकतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची अलीकडेच SCO बैठकीदरम्यान भेट झाली होती. ब्रिक्स शिखर परिषदेत दोन्ही नेत्यांची पुन्हा भेट होणार असल्याने या तेल व्यवहाराकडे विशेष लक्ष लागले आहे.




Leave a Reply