
भारतीय क्रिकेट संघ सध्या दुखापतीने ग्रासला आहे. एक एक खेळाडू दुखापतग्रस्त होत आहेत. दुखापतीच्या या वाढत्या घटनांमुळे बीसीसीआयचं सेंटर ऑफ एक्सीलेन्स अर्थात सीओई टीकेचं धनी ठरलं आहे. जगातील सर्वात श्रीमंत बोर्ड असताना सीओईची परिस्थिती इतकी वाईट असल्याची चर्चा क्रीडा वर्तुळात रंगली आहे. असं असताना सीओईचे प्रमुखे व्हीव्हीएस लक्ष्मण यांनी या चर्चांवर आपलं रोखठोक मत मांडलं आहे. सीओई हे काही पुनर्वसन केंद्र नाही. येथे खेळाडूंच्या चांगल्या कामगिरीसाठी काम केलं जातं, असं त्यांनी सांगितलं. यासह व्हीव्हीएस लक्ष्मण याने संघ व्यवस्थापन, निवड समिती आणि सीओई यांच्यात एकमत नसल्याचे दावे देखील फेटाळून लावले आहेत.
काय म्हणाला व्हीव्हीएस लक्ष्मण?
व्हीव्हीएस लक्ष्मण याने स्पष्टीकरण देताना सांगितलं की, ‘आम्हाला ब्लेम हा शब्द वापरायला आवडत नाही, कारण जेव्हा तुम्ही तो शब्द वापरता, तेव्हा तुम्ही कोणाला तरी बळीचा बकरा बनवत असता. सीओई, पुरुष आणि महिला दोन्ही संघांचे संघ व्यवस्थापन, एसएसएम कर्मचारी आणि निवड समिती यांच्यात उत्कृष्ट समन्वय आहे. निवडकर्ता फिटनेस स्थिती अहवालासाठी सीओईशी संपर्क साधतो आणि आम्ही तो मिळवून निवड समितीच्या अध्यक्षांना पाठवतो, तसेच त्याची एक प्रत दोन्ही संघांच्या मुख्य प्रशिक्षकांना आणि बीसीसीआला देखील पाठवतो.’ जसप्रीत बुमराह आणि साई सुदर्शन यांच्याबाबतही स्पष्टीकरण देण्यात आलं.
साई सुदर्शन आणि जसप्रीत बुमराह यांची निवड तंदुरूस्तीची मंजुरी मिळेल या शक्यतेने ठेवली होती. पण त्याचं फिटनेस तपासत असताना त्यात काही त्रुटी आढळल्या तर निवड समिती अध्यक्ष आणि मुख्य प्रशिक्षकांशी संवाद साधला गेला. हे सर्व काही सुरळीतपणे सुरू असल्याचं स्पष्टीकरण व्हीव्हीएस लक्ष्मण यांनी दिलं. पुनर्वसन करत असलेल्या खेळाडूंना तंदुरुस्तीचे निकष पूर्ण होईपर्यंत केंद्रातून सोडले जात नाही, असंही लक्ष्मणने पुढे सांगितलं.
संघ निवडीवर देवजीत सैकिया म्हणाले की…
बीसीसीआय सचिव देवजीत सैकिया म्हणाले की, ‘संघ निवडीच्या आमच्या बैठका संघ प्रवासाला निघण्याच्या तीन चार आठवडे आधी होतात. त्यामुळे संघ निवडीच्या वेळी आम्हाला खेळाडूची नेमकी स्थिती माहीती नसते. जर एखादा खेळाडू या काळात बरा झाला, तर तो संघात असेल, असं गृहीत धरतो. निवडीच्या तारखेमुळे आम्ही कोणालाही सरळ नाकारत नाही. आम्ही खेळाडूंना वंचित ठेवत नाही आणि मानवी शरीराचा अंदाज कोणीही लावू शकत नाही; खेळाडू काही यंत्र नाहीत.’
Leave a Reply