
नेपाळमध्ये काल मोठा जलप्रलय आला. या जलप्रलायात 160 हून अधिक पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. तर शेकडो लोक वाहून गेले आहेत. बेपत्ता झाले आहेत. घरापासून इमारतीपर्यंत आणि माणसांपासून जनावरांपर्यंत सर्वच वाहून गेल्याने नेपाळमध्ये हाहा:कार उडाला आहे. अनेक भागांचा संपर्क तुटल्याने येथील जनजीवन विस्कळीत झालं आहे. अनेक देशातील पर्यटक या महाप्रलयात अडकून पडले आहेत. महाराष्ट्रातूनही काही पर्यटक तिथे गेले आहेत. या सर्वांशी संपर्क साधण्याचा आणि नेमके किती पर्यटक नेपाळमध्ये गेले याचा आकडा जुळवण्याचं काम सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासाठी आम्ही केंद्र सरकारच्या संपर्कात असल्याचं म्हटलं आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नेपाळ दुर्घटनेच्या अनुषंगाने आज महत्त्वाची अपडेट दिली आहे. मीडियाशी बोलताना केंद्र आणि राज्य स्तरावर काय काय प्रयत्न सुरू आहेत, याची माहिती फडणवीस यांनी दिली. नेपाळच्या दुर्घटनेत दगावलेल्या लोकांच्या कुटुंबाबाबत आमची संवेदना आहे. भारतीय लोकं आणि महाराष्ट्रातील लोकही तिथे असण्याची शक्यता आहे. त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न सुरू आहे. गिरीश महाजन या सर्व घटनेत संपर्क ठेवून आहेत. काही लोकं तिबेटमध्येही गेले असल्याची माहिती आहे. त्यांच्याशीही संपर्क झाला आहे. आम्ही एनएची मदत घेत आहोत. दिल्लीच्या माध्यमातून मानसरोवर यात्रेला गेलेल्या पर्यटकांना परत आणण्याचं प्लानिंग करत आहोत. केंद्र सरकारशी बोलणं सुरू आहे. आम्ही सर्व अलर्ट मोडवर आहोत. कुणाचाही संपर्क झाला तर त्याला रेस्क्यू करणार आहोत. कुणाकडे काहीही माहिती असेल तर आम्हाला द्या. आम्ही मदत करणार आहोत, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.
तर पुण्याच्या विकासावर परिणाम
भोर तालुक्यातील भोंगवली हाय व्होल्टेज सबस्टेशन आणि टॉवर लाईनला स्थानिकांनी विरोध केला आहे. त्यावरही मुख्यमंत्र्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. केंद्र सरकारच्या मदतीने ट्रान्समिशन लाईन टाकण्यात येत आहे. त्यातील काही भाग हा भोरमधून जाणार आहे. मात्र, अनेक प्रकल्पांसाठी आधीच आमच्या जमिनी गेल्या. त्यात या प्रकल्पासाठी अजून जमीन जाणार आहे, असं स्थानिकांचं आणि तिथल्या समितीचं म्हणणं आहे. ट्रान्समिशनचं 40 टक्के काम झालं आहे. आम्ही स्थानिकांना समजावलं आहे. पुण्याला विजेची मागणी वाढत आहे. सबस्टेशन तयार केले नाही तर पुण्याला वीज कमी पडेल. भोरच नाही तर पुण्यातील इतर तालुक्यातही आपण सब स्टेशन तयार करत आहोत हे त्यांना दाखवलं आहे. आमचे अधिकारी त्यांच्यासोबत चर्चा करत आहेत. मार्ग काढला जात आहे. आम्ही त्यांना आवाहनही केलं आहे. कॉरिडोअरला विरोध केला तर पुण्याच्या विकासावर परिणाम होईल, असं त्यांना सांगितल्याची माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली.
कोणीही असो कारवाई होईल
एमपीएससीच्या पेपरफुटीवरही मुख्यमंत्र्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. या प्रकरणात कोणीही असो, कोणत्याही पक्षाचा असो कारवाई होईल. एमपीएससीच्या संदर्भात परीक्षा पारदर्शी झाल्या पाहिजे, हे शासनाचं मत आहे. पोलिसांचा रिपोर्ट आलाय. त्यात मास पेपर फुटला नसल्याचं म्हटलंय. एका व्यक्तीकडे पेपर गेला. त्यामुळे पारदर्शिकतेसाठी एमपीएससीने सर्व परीक्षा रद्द केली आहे. आपण परीक्षेत बदल करण्यासाठी समिती स्थापन केली आहे. परीक्षा पारदर्शी करण्याचा प्रयत्न करणार आहोत. सरकार एमपीएससीला मदत करणार आहे. विद्यार्थी, शिक्षक आणि स्टेक होल्डरशी समिती चर्चा करून एक चांगली परीक्षा पद्धती तयार करणार आहे, असं त्यांनी सांगितलं. काही लोक या प्रकरणात केवळ यावर राजकारण करत आहेत. ते योग्य नाही. नवनाथ बन यांनी या प्रकरणातील व्यक्ती कुणाचा कार्यकर्ता आहे हे फोटो दाखवून सांगितलं आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
मराठा समाजासाठी आणखी निर्णय घेऊ
यावेळी त्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनावरही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. जरांगे यांनी ज्या मागण्या केल्या. त्यावर कारवाई केली आहे. पुढेही कारवाई करण्यात येणार आहे. आमची जरांगेंशी चर्चा सुरू आहे. आमचे प्रतिनिधी सरकारचे निर्णय त्यांच्यापर्यंत पोहोचवतील. या सरकारने मराठा समाजासाठी जेवढे निर्णय घेतले आणि काम केलं तेवढं कधी झालं नाही. आमच्या सरकारनेच मराठा समाजासाठी निर्णय घेतले आहेत. अजून घेण्याची गरज असेल तर घेऊ, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
Leave a Reply