
बॉलिवूड इंडस्ट्रीतील दिग्गज अभिनेते दिनेश हिंगू यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. 86 वर्षीय दिनेश यांचा हा दोन महिन्यांपूर्वीचा व्हिडीओ असल्याचं म्हटलं जात आहे. यामध्ये ते चाहत्यांशी बोलत असून इंडस्ट्रीत काम करण्याची इच्छा व्यक्त करताना दिसत आहेत. औषधं आणि उपचारासाठी पैशांची गरज असल्याचं ते म्हणतात. हा व्हिडीओ व्हायरल होताच इंडस्ट्रीतील अनेक कलाकारांनी त्यांच्याबद्दल काळजी व्यक्त करत मदतीचा हात पुढे सरसावला. परंतु आता दिनेश यांच्या पत्नीने त्या व्हिडीओवर स्पष्टीकरण दिलं आहे. लोकांना काहीतरी गैरसमज झाल्याचं त्यांनी म्हटलंय.
पारस पब्लिसिटीचे इंडस्ट्रीतील ज्येष्ठ सदस्य राजेश वसानी यांनी दिनेश यांच्या कुटुंबीयांशी बोलल्यानंतर या दाव्यांची पडताळणी केली आणि फेसबुक पोस्टवर माहिती दिली. त्यांनी लिहिलं, “मी अरुणा इराणी यांच्यामार्फत दिनेश हिंदू यांच्या पत्नी जमुना यांच्याशी संपर्क साधला. तेव्हा त्यांनी स्पष्ट केलं की, त्यांचं कुटुंब दोन मुलं आणि नातवंडांसह सुस्थितीत आहे. दिनेश यांची प्रकृतीही उत्तम आहे. वृत्तांमध्ये काही गैरसमज झाला असावा. तरी सर्वांनी दाखवलेल्या काळजीबद्दल त्यांनी आभार मानले आहेत.” दिनेश यांच्या पत्नी जमुना या प्रतिष्ठित गुजराती रंगमंच कलाकार आहेत.
दिनेश यांचा व्हिडीओ व्हायरल होताच राकेश रोशन, बोनी कपूर यांसारख्या सेलिब्रिटींनी लगेच मदत जाहीर केली होती. तर अमिताभ बच्चन यांच्या कार्यालयातूनही मदतीचा हात पुढे आला होता. परंतु दिनेश यांच्या पत्नीकडून वस्तुस्थितीची पडताळणी केल्यानंतर कुटुंब सुस्थितीत असून त्यांना कोणीत्याही मदतीची आवश्यकता नसल्याचं स्पष्ट करण्यात आलं. दिनेश हिंगू हे गेल्या अनेक दशकांपासून बॉलिवूडमध्ये कार्यरत आहेत. ‘बाजीगर’, ‘हमराज’, ‘साजन’, ‘नो एण्ट्री’ यांसारख्या चित्रपटांमध्ये त्यांनी दमदार भूमिका साकारल्या आहेत. विनोदाच्या अचूक टायमिंगसाठी ते ओळखले जातात. दिनेश यांचा जन्म 13 एप्रिल 1940 रोजी गुजरातच्या वडोदरा इथं झाला. मुंबईत येण्यापूर्वी त्यांनी नाट्यक्षेत्रातील प्रवासाला सुरुवात केली होती. गेल्या अनेक वर्षांत त्यांनी हिंदी, गुजराती, मराठी आणि भोजपुरी चित्रपटांमध्ये काम केलंय.
Leave a Reply