
ठाकरे गटाचे सहाही फुटीर खासदार आणि ममता बॅनर्जी यांच्या फुटीर खासदारांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या सर्व खासदारांना धीर दिला. तुम्ही चिंता करू नका. मी तुमच्यासोबत आहे. एनडीए हे एक कुटुंब आहे, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या खासदारांना धीर दिला. तसेच त्यांना संसदेत होणाऱ्या चर्चांमध्ये भाग घेण्याचा सल्लाही दिला. काही दिवसांपूर्वी पंतप्रधानांनी राज्यसभेवर निवडून आलेल्या एनडीएच्या खासदारांशीही संवाद साधून त्यांना मार्गदर्शन केलं होतं.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटण्यासाठी शिंदे गटात नव्याने दाखल झालेले हे सहाही खासदार आणि ममता बॅनर्जींचे खासदार आले होते. या सर्व खासदारांसोबत नरेंद्र मोदी यांनी नाश्ता करून त्यांच्याशी चर्चाही केली. तसेच एनडीए हे एक कुटुंब असल्याचं त्यांना सांगितलं. आम्ही मित्र पक्षांच्या सोबत आहोत. तुम्ही संसदेतील चर्चांमध्ये भाग घ्या. संसदेचा इतिहास वाचा. संसदेला, संसदेच्या कामकाजाला समजून घ्या. संसदेच्या इतिहासाबाबतचं खूप मटेरियल आहे. चर्चेत भाग घेण्यासाठी या मटेरियलचा उपयोग करून घ्या, असं सांगतानाच आपल्या राज्याच्या विकासासाठी काम करा. राज्यांचा विकास झाला तर देशाचा विकास होईल, असं पंतप्रधानांनी त्यांना सांगितलं.
मी तुमच्यासोबत
तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही. मी तुमच्यासोबत आहे, असं मोदी म्हणाले. उद्धव ठाकरे यांच्या पक्षातून शिंदे गटात आलेल्या खासदारांना मोदींनी धीर दिला. एनडीएमध्ये प्रत्येक व्यक्तीचा सन्मान केला जातो. सर्वांना संधी दिली जाते. आम्ही एनडीएच्या केवळ एखाद्या मित्र पक्षाच्या नाही तर प्रत्येक खासदारांच्या पाठी आहोत. तुम्हाला कुणाची चिंता करण्याची गरज नाहीये, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
पार्थ पवारांशी वेगळा संवाद
यावेळी मोदींनी बैठकीवेळी एनसीपी नेते पार्थ पवार यांच्याशी एकांतात चर्चा केली. यावेळी त्यांनी आई कशी आहे? त्यांची काळजी घ्या, अशी विचारणा मोदींनी केली. यावेळी मोदींनी पार्थ पवारांकडे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या प्रकृतीची मराठीत विचारपूस केली.
Leave a Reply