• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

तुरुंगातून आला आणि भविष्य सांगू लागला, अमावस्या, पौर्णिमेला… मनोहर भोसलेने कसं बनवलं अनेकांना ‘मामा’

April 27, 2026 by admin Leave a Comment


बाळू मामाचा अवतार म्हणवून घेणाऱ्या सोलापूरच्या मनोहर भोसले ऊर्फ मनोहर मामाला अटक झाली आहे. तुरुंगात असलेल्या मनोहर भोसलेच्या अनेक सुरसकथा समोर येऊ लागल्या आहेत. त्याने अनेकांना कसं ‘मामा’ बनवलं याची माहिती आता समोर येऊ लागली आहे. त्याच्यावर या आधी लैंगिक शोषणाचा आरोप करण्यात आला होता. त्यात त्याला अटकही झाली होती, अशी माहितीही समोर आली आहे. अवतार घोषित केल्यानंतर भोसलेने स्वत:चं साम्राज्य उभं केलं. अलिशान आश्रम उभारला. आज त्याच आश्रमावर गुन्हे अन्वेषण विभाग, सायबर क्राईम आणि आर्थिक गुन्हे शाखेने धाड मारून संयुक्त तपास सुरू केला आहे. या तपासात तिन्ही यंत्रणांच्या हाती मोठं घबाड लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मनोहर भोसलेवर 2021 मध्ये करमाळा पोलिस ठाण्यात लैंगिक शोषणाचा गुन्हा दाखल झाला होता. त्याला अटकही झाली होती. त्यानंतर तो जामिनावर सुटला. सुटल्यावर त्याने करमाळा तालुक्यातील घोटी येथे 27 एकरामध्ये नवीन मठ उभा केला. आणि पुन्हा लोकांना भविष्य सांगण्यास सुरुवात केली. त्याच्या या आश्रमात अमावस्या आणि पौर्णिमेला प्रचंड गर्दी व्हायची. त्यानंतर त्याने उंदरगाव या त्याच्या मूळ गावातही मठ सुरू केला. तिथेही लोकांना दर्शनासाठी जायला तो भाग पाडत असल्याचं सूत्रांनी सांगितलं.

आधी पावती, नंतर दर्शन

राज्यभरातून भाविक दर्शनासाठी आणि भविष्य जाणून घेण्यासाठी येत होते. विशेष म्हणजे त्याच्या गावातील लोक त्याच्याकडे भविष्य जाणून घेण्यासाठी जात नव्हते. पण बाहेरचे लोक येत होते. त्यात लोकप्रतिनिधींचाही समावेश असल्याने त्याची लोकप्रियता वाढू लागली. त्याचाच फायदा घेऊन त्याने भविष्य सांगण्यासाठी फी आकारण्यास सुरुवात केली. 11 ते 21 हजाराची पावती फाडल्यावरच तो भविष्य सांगत असे. भविष्य जाणून घ्यायचे असेल तर त्याच्याकडे आधी ही पावती द्यावी लागत असेल. ज्याने पावती दिली त्याचंच भविष्य सांगितलं जाई. यातून त्याने बक्कळ कमाई केल्याचं समोर आलं आहे.

घोटी आश्रमाची सुरू झाली झाडाझडती

दरम्यान, भोंदू बाबा मनोहर मामा भोसले याच्या विरोधात आता पोलिसांनी तपासाचा फास आवळण्यास सुरुवात केली असून आज घोटी येथील आश्रमाची झाडाझडती सुरू झाली आहे. मनोहर भोसले याच्यावर फसवणूक आणि जादूटोणा विरोधी कायद्यान्वये गुन्हा दाखल झाल्यानंतर न्यायालयाने त्याला मंगळवारपर्यंतची पोलीस कोठडी सुनावली आहे. या दरम्यान मनोहर भोसलेने कोट्यवधीची माया कशी जमवली? याचा तपास पोलीस आर्थिक गुन्हे शाखेच्या मदतीने करत असून यासाठी आश्रमातील सर्व रेकॉर्ड तपासण्यास सुरुवात केली आहे.

पत्नीच्या नावावर आश्रम

मनोहर भोसलेने उंदरगाव, बारामती एमआयडीसी शेजारी असणाऱ्या गोजूबावी, घोटी, गाणगापूर आदी ठिकाणी कोट्यावधी रुपयांच्या जागा आलिशान आश्रमासाठी खरेदी केल्या होत्या. या जागा नेमक्या कोणाच्या नावावर आहेत? त्याला आर्थिक मदत कुठून होती? याचा आर्थिक गुन्हे शाखा तपास करत असून यातून अनेक चेहरे उघडे होण्याची शक्यता आहे. घोटी येथील 27 एकरावर उभा असलेला आलिशान आश्रम हा मनोहर मामाच्या पत्नीच्या नावावर असल्याची माहिती मिळत असून बारामती जवळील जागा ही त्यांचे विश्वासू सहकारी विशाल वाघमारे यांच्या नावावर असल्याचे समजत आहे.

देणग्या कशा आल्या?

घोटी येथील आश्रमातील मनोहर मामाच्या सर्व गैर कृत्यांचा तपासही पोलीस करत असून यासाठी सायबर विभागाची मदतही घेण्यात येत आहे. मनोहर भोसलेने भोंदूगिरी करताना नेमके काय काय प्रताप केले ते या चौकशीतून उघड होणार असून त्याने आतापर्यंत नेमकी किती माया जमवली हे सुद्धा समोर येणार आहे. आश्रमात असणारे सर्व कागदपत्र पोलीस तपासत असून भाविकांकडून घेण्यात येत असलेल्या देणग्या आणि इतर पैसे कशा मार्गाने येत होते याचाही तपास सुरू झाला आहे.

पोलिसांनी घोटीमध्ये सुरू असलेल्या आश्रमासोबतच मनोहर मामाचा मांजरी जवळील फार्म हाऊस, पुण्यातील राहात असलेला फ्लॅट, गाणगापूर आश्रम, उंदरगाव आश्रम आणि इतर ठिकाणीही एकाच वेळी तपास सुरू केल्याने आता मनोहर मामाच्या गळ्याभोवतीचा फास आवळला गेला आहे.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • IPL 2026 : मुंबईला मोठा धक्का, दुखापतीमुळे मॅचविनर खेळाडू स्पर्धेतून आऊट, कुणाचा समावेश?
  • 2026 मधील सर्वांत वादग्रस्त चित्रपट, 2 महिन्यांनंतर अखेर ओटीटीवर; देशभरात झाला होता वाद
  • पूर्वजांच्या या वस्तू सापडल्यास ठेवा जपून, फेकून देण्याची चूक न केल्यास व्हाल सर्वात श्रीमंत!
  • IPL 2026: अंगकृष रघुवंशीला तसं वागणं पडलं महागात, सामना मानधनातून 20 टक्के रक्कम कापली
  • आज काय केलं? फुस्सससस, फुस्सससस… गुणरत्न सदावर्तेंनी सरनाईकांसह राज ठाकरेंना डिवचलं

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in