
पंजाबच्या पटियालामध्ये सोमवारी रात्री उशिरा एक घटना घडली. शंभू-अंबाला रेल्वे ट्रॅकवर जोरदार स्फोट झाला. यात रेल्वे ट्रॅकचं नुकसान झालं आहे. स्फोटाच्या ठिकाणी एका व्यक्तीचा मृतदेह सापडला आहे. सोमवारी रात्री 10 च्या सुमारास मालगाडीसाठी आरक्षित ट्रॅकजवळ हा स्फोट झाला. स्फोटाची माहिती मिळताच पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी, डिआयजी आणि पटियालाचे एसएसपी वरुण शर्मा घटनास्थळी पोहोचले. राजकीय रेल्वे पोलीस आणि रेल्वे सुरक्षा पथकाची टीम सुद्धा चौकशीसाठी घटनास्थळी दाखल झाली.
पटियालाचे एसएसपी वरुण शर्मा यांनी माहिती देताना सांगितलं की, “स्फोटामुळे रेल्वे ट्रॅकचं काही प्रमाणात नुकसान झालं आहे. हा कमी तीव्रतेचा स्फोट होता. या प्रकरणाची चौकशी सुरु आहे” जिथे स्फोट झाला, तिथे एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळला आहे. अजूनपर्यंत हे स्पष्ट झालेलं नाही की, त्या व्यक्तीचा मृत्यू स्फोटामुळे झाला की काही अन्य कारण आहे.
जानेवारी महिन्यात सुद्धा असाच स्फोट
मृतदेह आणि स्फोट यांच्यात काय संबंध आहे? या अंगाने तपास सुरु असल्याचं एसएसपी शर्मा यांनी सांगितलं. फॉरेंसिकची एक टीम स्फोट झाला त्या ठिकाणचे नमुने गोळा करत आहे. स्फोटासाठी कुठल्या घटकांचा वापर झाला ते शोधून काढण्याचं काम सुरु आहे. पोलिसांना कुठलीही शक्यता सोडायची नाही, म्हणून ते या स्फोटाचा प्रत्येक अंगाने तपास करत आहेत. याआधी यावर्षी जानेवारी महिन्यात सुद्धा असाच स्फोट झाला होता. फतेहगढ साहिब जिल्ह्यातील सरहिंद येथे फ्रेट कॉरिडोर ट्रॅक वर स्फोट झालेला. यात एका ट्रेनच्या इंजिनचं नुकसान झालं होतं. लोको पायलट सुद्धा जखमी झालेला.
तपास यंत्रणांना चक्रावून सोडलं
रेल्वे ट्रॅकजवळ झालेल्या या स्फोटाने तपास यंत्रणांना चक्रावून सोडलं आहे. हा कुठल्या मोठ्या कटाचा भाग आहे का? असा प्रश्न निर्माण होतोय. काही दिवसांपूर्वी चंदीगड येथील सेक्टर 37 मध्ये भाजप कार्यालयाबाहेर पार्किंगमध्ये स्फोट झाला होता. या स्फोटांचं आपसात काय कनेक्शन आहे का? या अंगाने तपास सुरु आहे.
Leave a Reply