
गुरुग्राम येथील गढौली कला गावातील एका घरात खळबळ उडाली जेव्हा टॉयलेटमधून भयानक आणि विचित्र आवाज ऐकू येऊ लागलो. घरातील सदस्यांनी दरावाजा तोडून टॉयलेटमध्ये जाण्याची हिंमत तर केली, पण आता गेल्यानंतर त्यांना संपूर्ण टॉयलेटमध्ये काहीच दिसलं नाही. जशी वेळ निघून जात होती, तसा आवाज आणखी भयानक होत होता…शांतता भेदणारा तो सळसळण्याचा आवाज थेट टॉयलेट सीटच्या खालून येत होता. संपूर्ण कुटुंबियांच्या मनात भीती होती आणि त्या टॉयलेटचा वापर करण्याची हिंमत कोणातच नव्हती…
विचित्र आवाजांनी त्रासलेल्या घर मालकाने अखेर मोठा निर्णय घेण्याचं ठरवलं. प्रकरणाची चौकशी करण्याची जबाबदारी वन्यजीव संरक्षक अनिल गांडास आणि त्यांच्या पथकाकडे सोपवण्यात आली. घटनास्थळी पोहोचलेल्या अनिल गंडास यांनी टॉयलेटवर फक्त हलकं टॅप केलं. तेव्हा आतून येणारा आवाज आणखी भयावह झाला. मनात भीती असून सुद्धा प्लंबर आणि रेस्क्यू टीमच्या मदतीने टॉयलेट सीट तोडण्याचं काम सुरु केलं. पॉटचा काही भाग तोडल्यानंतर आतल्या कोपऱ्यात 6 फूट लांब विषारी स्पेक्टॅकल्ड कोबरा असल्याचं दिसून आलं. भयानक नागाला पाहून कुटुंबिय आणखी घाबरले.
अत्यंत अरुंद जागेत लपलेला सहा फूट लांब नाग पाहून बचाव पथकाच्या अंगावर काटा उभा राहिला; कारण थोडीशीही चूक जीवघेणी ठरू शकली असती. अत्यंत खबरदारी घेत, अनिल गांडास यांच्या पथकाने कठीण मोहिमेनंतर टॉयलेट सीटच्या ढिगाऱ्यातून त्या विषारी नागाची यशस्वीरीत्या सुटका केली. सापाला सुरक्षितपणे बाहेर काढताच त्या कुटुंबाने सुटकेचा निःश्वास सोडला.
साप आता मानवी वस्तीत देखील दिसत आहे. याचं एकमेव कारण म्हणजे, शहरीकरण आणि जंगलतोड आहे. या धक्कादायक घटनेवर भाष्य करताना वन्यजीव तज्ज्ञ अनिल गांडास यांनी सांगितलं की, वेगाने होणारं शहरीकरण आणि सुरू असलेल्या बांधकाम कार्यांमुळे जंगले व शेतजमिनी नष्ट होत आहेत. नैसर्गिक अधिवास आणि अन्नाचे स्रोत हिरावले गेल्यामुळे, उंदीर व इतर लहान प्राण्यांच्या शोधात साप मानवी वस्त्यांमध्ये आणि घरांमध्ये शिरत आहेत. धक्कादायक गोष्ट म्हणजे ऑगस्ट महिन्यात त्यांनी जवळपास 70 सापांचं रेस्क्यू केलं आहे… मागील 3 महिन्यात हा आकडा 200 वर गेला आहे.
Leave a Reply