
कलर्स मराठीवरील 'जय जय स्वामी समर्थ' ही लोकप्रिय मालिका आता 1800 भाग आणि तब्बल पाच वर्षांचा देदीप्यमान प्रवास पूर्ण करत आहे. या विशेष टप्प्यावर कथा एका अशा निर्णायक वळणावर येऊन ठेपली आहे, जिथे श्रद्धा आणि अंधश्रद्धा यांच्यातील संघर्ष अधिक तीव्र होणार आहे.
“आज्ञेविना काळ ना नेई तयाला… परलोकीही ना भीति तयाला…” या प्रभावी कथासूत्राने सजलेली ही गाथा स्वामींच्या दिव्य लीलांमधून भक्तीची अढळ शक्ती दाखवत आली आहे. मात्र आता या श्रद्धेच्या विश्वात मार्तंड, जो स्वतःला दैवी स्वरूपात सादर करत लोकांच्या मनात संभ्रम निर्माण करतो. स्वामी त्याला कशी अद्दल घडवणार? स्वामी भक्तांच्या मनातील श्रध्दा दृढ व्हावी ह्यासाठी काय काय घडवून आणणार? हे आगामी भागात पहायला मिळणार आहे.
मार्तंड आपल्या चतुराईने, भीती आणि अंधविश्वास यांचा आधार घेत गावकऱ्यांना आपल्या प्रभावाखाली आणताना दिसतो. त्याच्या चमत्कारांच्या आड लपलेला हेतू आणि बनावट अध्यात्मिकतेचा खेळ हळूहळू पसरत जातो. तो स्वामींच्या प्रभावालाच आव्हान देत, त्यांच्या स्थानावर डोळा ठेवतो. पण दुसरीकडे, स्वामी शांत, संयमी आणि गूढ पद्धतीने या सगळ्या घडामोडींना सामोरे जात आहेत.
ते थेट संघर्ष न करता, आपल्या लीलांमधून आणि सूचक इशाऱ्यांमधून सत्याची जाणीव करून देत आहेत. जिथे मार्तंड भ्रम निर्माण करतो, तिथे स्वामी भीतीवर मात करणारी खरी श्रद्धा रुजवत आहेत आणि हाच या महासंग्रामाचा केंद्रबिंदू ठरतो. या सगळ्या घडामोडींमध्ये अंबादाससारख्या डोळस भक्ताची अढळ श्रद्धा आणि रेणुकासारख्या आईची भावनिक घालमेल कथा अधिकच हृदयस्पर्शी बनवते.
एकीकडे भक्तीची परीक्षा, तर दुसरीकडे भ्रमाचा प्रभाव या दोन्हींच्या संघर्षात प्रेक्षकांना सतत विचार करायला भाग पाडणारा प्रवास अनुभवायला मिळणार आहे. 1800 भागांच्या या टप्प्यावर मालिका प्रेक्षकांना एका नव्या उंचीवर घेऊन जात आहे, जिथे प्रश्न फक्त एवढाच स्वामींचं सत्य श्रेष्ठ ठरेल की मार्तंडचा भ्रम प्रभावी ठरेल? याचं उत्तर उलगडत जाणार आहे.




Leave a Reply