
Donald Trump And Giorgia Meloni : अमेरिका-इराण यांच्यातील इस्लामाबादमधील बैठक निष्फळ ठरल्यानंतर आता हे दोन्ही देश एकमेकांविरोधात चांगलेच आक्रमक झाले आहेत. इराणची सामुद्रधुनी खुली करावी यासाठी अमेरिकेने त्या भागात थेट नाकेबंदी केली आहे. इराणविरोधात युद्ध सुरू झाल्यानंतर अमेरिकेने नाटो देश, युरोपीयन देशांना या युद्धात साथ देण्याचे आवाहन केले होते. परंतु अनेक देशांनी अमेरिकेला मदत केली नाही. यात इटली या देशाचाही समावेश आहे. दरम्यान, आता डोनाल्ड ट्रम्प इटलीविरोधात प्रचंड संतापले आहेत. त्यांनी इटली या देशांविरोधात आगपाखड केली असून त्या देशाच्या पंतप्रधानांवरही सडकून टीका केली आहे.
डोनाल्ड ट्रम्प जॉर्जिया मेलोनी यांच्यावर नाराज
इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी होर्मुझची सामुद्रधुनी, ख्रिस्ती धर्मगुरू पोप लिओ, सध्याचे युद्ध याबाबत अमेरिकेला अनुकूल भूमिका घेतली नाही. त्यामुळेच डोनाल्ड ट्रम्प जॉर्जिया मेलोनी यांच्यावर नाराज आहेत. ट्रम्प यांनी इटलीतील कोरिरे डेला सेरा या वर्तमानपत्राला एक मुलाखत दिली. याच मुलाखतीत त्यांनी मेलोनी यांच्यावर सडकून टीका केली आहे.
डोनाल्ड ट्रम्प नेमकं काय म्हणाले?
मला वाटायचं की जॉर्जिया मेलोनी यांच्यात हिंमत आहे. परंतु मी चुकीचा होतो. उर्जेसाठी इटलीला जगाच्या तुलनेत सर्वाधिक पैसे खर्च करावे लागतात. तरीदेखील त्या स्ट्रेट ऑफ होर्मुझसाठी लढायला तयार नाहीत. होर्मुझची सामुद्रधुनी खुली करण्यासाठी त्या माझ्यावर अवलंबून आहेत, अशी टीका डोनाल्ड ट्रम्प यांनी केली. मला जॉर्जिया मेलोनी यांचे धोरण अमान्य आहे. इराणजवळ अण्वस्त्र आहे की नाही याचा त्यांना फरक पडत नाही. इराणला संधी मिळाली तर ते इटलीला दोन मिनिटात उडवून टाकतील. आता जॉर्जिया मेलोनी पहिल्यासारख्या राहिलेल्या नाहीत, असेही ट्रम्प म्हणाले.
आता इटली नेमकं काय उत्तर देणार?
दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प यांनी महिन्याभरापूर्वी जॉर्जिया मेलोनी यांचे तोंडभरून कौतुक केले होते. परंतु आता त्यांनी मेलोनी यांच्यावर टीका केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या टिकेवर आता इटलीचे सरकार नेमकी काय भूमिका घेणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
Leave a Reply