
इरफान खान आज आपल्यात नसला तरी त्याच्या भूमिका चाहत्यांच्या मनात कायम जिवंत आहेत. जर तुम्हीसुद्धा इरफानचे चाहते असाल, तर त्याचा एक शॉर्टफिल्म आवर्जून पहा. 16 ते 17 मिनिटांच्या या शॉर्टफिल्ममध्ये क्राइमचा भयानक चेहरा पहायला मिळतो. हा पूर्णपणे सायलेंट चित्रपट आहे, तरीही लोकांना तो खूप आवडला आहे.
या चित्रपटात इरफान आणि नवाजुद्दीन सिद्दिकी यांच्या भूमिका आहेत. 2003 मध्ये आलेल्या या शॉर्टफिल्मचं नाव 'द बायपास' असं आहे. हा एक उत्तम सायलेंट क्राइम थ्रिलर आहे. तुम्हाला तो युट्यूबवर मोफत पाहता येईल. प्रेक्षकांनी त्यावर जबरदस्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. या शॉर्ट फिल्मला 6.5 दशलक्षांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.
या शॉर्ट फिल्मचं वैशिष्ट म्हणजे यात कोणताही डायलॉग नाही. फक्त अभिनय आणि भावनांच्या आधारे या चित्रपटाची कथा मांडण्यात आली आहे. यातील इरफान आणि नवाजुद्दीनच्या जोडीला प्रेक्षकांनी खूप पसंत केलंय. यामध्ये इरफान एका भ्रष्ट पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत आहे. तर नवाजुद्दीनने एका हिंसक लुटारूची भूमिका साकारली आहे.
या शॉर्ट फिल्मची कथा राजस्थानमधल्या एका निर्जन बायपास रस्त्यावर घडते, जिथे हे गुंड येणाऱ्या-जाणाऱ्यांना लुटतात आणि त्यांची हत्या करतात. अमित कुमार यांनी याचं दिग्दर्शन केलं असून पार्श्वसंगीत आणि कलाकारांचे हावभाव यांमुळे कथा अधिक दमदार वाटते.
हा लघुपट एडिनबर्ग आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव आणि ऑबॅन चित्रपट महोत्सव यांसारख्या प्रतिष्ठित मंचांवर प्रदर्शित झाला होता. यातल्या गुन्हेगारीचं चित्रण अंगावर अक्षरश: काटा आणतो.





Leave a Reply