
अमरावती येथील शासकिय रुग्णालयातील अग्निकांडाने नवजात बालकं दगावली. त्यांच्या आयांनी हंबरडा फोडला. या घटनेने येथील गलथान कारभार चव्हाट्यावर आला. सरकारी यंत्रणा अजूनही उत्तरदायित्व स्वीकारत नसल्याचे समोर आले आहे. या घटनेनंतर शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी शासकीय रुग्णालयाची झाडाझडती घेतली. त्यांनी शासकीय अधिकाऱ्यांना फैलावर घेतले. त्याचवेळी त्यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर टीका केली. बावनकुळे हे सध्या राजस्थान दौऱ्यावर आहेत. त्यावरून अंधारे आणि आमदार नितीन देशमुख यांनी त्यांच्यावर निशाणा साधला.
ते पाणीपारी खाण्यात मश्गुल
इथे चिमुकले होरपळले अन् पालकमंत्री राजस्थानमध्ये पाणीपुरी खात असल्याचा आरोप शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी केला.
अमरावतीच्या शासकीय रुग्णालयात तीन नवजात बालकांच्या मृत्यूवरून सुषमा अंधारेंची चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर टीका केली. आमदार नितीन देशमुख यांनी राजस्थानमधील बावनकुळे यांचा व्हिडिओ दाखवून आयुक्तांनाही फोनवरून धारेवर धरले. बावनकुळे हे सध्या राजस्थान दोऱ्यावर आहेत.
मी एक आई आहे. आईचं दुःख मी समजू शकते. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मला आणि दोन आमदारांना येथील घटनेची माहिती घेण्यासाठी पाठवलं आहे, असे त्या म्हणाल्या. गेल्या दोन तासांपासून आम्ही चौकशी समितीमधील अधिकारी शोधत आहोत. मला फायर ऑडिट मिळालं नाही. इलेक्ट्रिक ऑडिट मिळालं नाही. अशी दुर्घटना घडू शकते हे जिल्हा शल्यचिकित्सकांना माहिती होतं. त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा का दाखल होऊ नये? असा सवाल ही अंधारे यांनी विचारला.
तीन नवजात बालकांचा मृत्यू
अमरावतील येथील स्त्री शासकीय रुग्णालयात अग्नितांडव घडले. तीन चिमुकल्यांचा होरपळून मृत्यू झाला. सोमवारी पहाटे साडेतीन वाजता नवजात शिशू कक्षात व्हेंटिलेटरचा स्फोट होऊन आग लागली. ती आग वेगाने पसरली. यानंतर रुग्णालयातील डॉक्टर्स आणि कर्मचाऱ्यांनी शिशू कक्षातील बालकांना बाहेर काढले. घटनेवेळी या कक्षात एकूण 9 बालकं होती. पण तीन बालकांचा मृत्यू झाला.
या घटनेनंतर आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी अमरावतीला धाव घेतली. त्यांनी चौकशीचे आदेश दिले. पण एकूणच कारभार पाहता विरोधकांनी केवळ चौकशीचा फार्स होत असल्याचा आरोप केला. आज सुषमा अंधारे यांनी अधिकाऱ्यांना आणि यंत्रणेला धारेवर धरले. अंधारेंनी अधिकाऱ्यांना चांगलेच फटकारले. यावेळी त्यांनी बावनकुळे यांच्यावर टीका केली.
Leave a Reply