
Nepal Flash Floods : भारतात प्रादेशिक अस्मितेला खूप महत्त्व आहे. किंबहुना भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर या प्रदेशिक अस्मितेचा जास्तच प्रचार, प्रसार झाला. याच प्रादेशिकतावादातून नंतर वेगवेगल्या राज्यात स्थानिक राजकीय पक्षांची निर्मिती झाली. आज दक्षिणेकडे तेथील दाक्षिणात्त्य अस्मितेला सर्वोच्च मानून अनेक राजकीय पक्ष सत्तेत आहेत. महाराष्ट्रातही महाराष्ट्र नवनिर्माण सेना यासारखे पक्ष आजही मराठी अस्मितेचा मुद्दा केंद्रस्थानी ठेवून आपले राजकारण करत आहेत. यूपी, बिहारी महाराष्ट्रात येऊन धुडगूस घालत आहेत, नोकऱ्या खात आहेत, असा आरोप केला जातो. त्यातून नंतर परराज्यातील लोकांना मारहाण झाल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. परंतु आणीबाणीच्या परिस्थितीत भारतातील नागरिक आपल्या प्रादेशिक अस्मिता सोडून देश सर्वोच्च मानत एकत्र आलेले आहेत. सध्या त्याचेच ज्वलंत उदाहरण समोर आले आहे. नेपाळच्या महापुरात अडकलेल्यांची सुटका झाल्यानंतर महाराष्ट्रातील काही लोकांची बिहार सरकारने, तेथील लोकांनी खूप काळजी घेतली आहे. या आदिरातीथ्याचे काही व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहेत.
स्थानिक नागरिक, पोलीस यंत्रणादेखील मदतीला धावून आली
नेपाळच्या महापुरात अडकलेल्या महापुरात महाराष्ट्रातील काही लोक अडकले होते. याच महाराष्ट्राच्या नागरिकांना नंतर बिहारमध्ये आणण्यात आले. या लोकांची बिहार सरकारतर्फे काळजी घेण्यात आली. त्यांना वेळेवर जेवण देण्यात आले. त्यांच्या राहण्याची, कपड्यांची व्यवस्था करण्यात आली. एवढेच नव्हे तर तेथील स्थानिक नागरिक, पोलीस यंत्रणादेखील महाराष्ट्रातील नागरिकांच्या मदतीला धावून आले. समोर आलेल्या व्हिडीओत एक पोलीस अधिकारी महाराष्ट्रातील नागरिकांना जेवण वाढताना दिसतोय. विशेष म्हणजे जेवण खूपच छान आहे, अशी प्रतिक्रियाही काही महिलांनी दिल्याचे या व्हिडीओमध्ये दिसत आहे.
नेपाळमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील लोकांना बिहार सरकारने सुखरुप पटना शहरात आणले.त्या महाराष्ट्रातील लोकांना बिहार पोलिसांनी जेवण दिले,राहणे झोपण्याची सोय केली.
पुढील वेळी बिहारी लोकांना शिव्या देताना याची जाणीव ठेवा.तसेही मनसेचे Zombies बिहारी लोकांना शिव्या देणारच. pic.twitter.com/y7Uk3zgp0S— ℳ𝖆𝖓𝖔𝖏 ℛ𝖆𝖓𝖊 (@wordsMahfil) August 30, 2026
शिव्या देताना याची जाणीव ठेवा
सोशल मीडियावर समोर आलेल्या या व्हिडीओत संंबंधित व्यक्तीने नेपाळमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील लोकांना बिहार सरकारने सुखरुप पटना शहरात आणले. महाराष्ट्रातील लोकांना बिहार पोलिसांनी जेवण दिले, राहणे, झोपण्याची सोय केली, असे सांगितले. तसेच पुढील वेळी बिहारी लोकांना शिव्या देताना याची जाणीव ठेवा, असे आवाहन केले. सोबतच मनसेचे Zombies बिहारी लोकांना शिव्या देणारच, असा टोलाही संबंधित युजरने लागवाला आहे. सध्या हा व्हिडीओ खूपच चर्चेचा विषय ठरला आहे.
Leave a Reply