
मुंबईतील एका हाय-राइज इमारतीत श्वेता तिवारीचं प्रशस्त घर आहे. घराच्या इंटेरिअरमध्ये अतिशय भपकेबाजपणाऐवजी साधेपणा, आरामदायीपणा आणि रंगीबेरंगी सजावटीचा सुंदर मेळ पहायला मिळतोय. घराच्या लिव्हिंग रुममध्ये पांढऱ्या रंगाच्या भिंती असून त्यावर रंगीत सजावटीच्या वस्तू आणि कलाकृतींमुळे घराला आकर्षक लूक मिळतो.
लाकडी फर्निचर, रंगीत दिवे आणि घरातील वेगवेगळ्या ठिकाणी ठेवलेली इनडोअर प्लांट्स यांमुळे घरात प्रसन्न वातावरण निर्माण होतं. सजावटीसोबतच घरातील प्रत्येक जागा वापरण्यासाठी आरामदायी ठेवण्यात आल्याचं दिसतं. श्वेताच्या घरातील सर्वांत लक्षवेधी गोष्टींपैकी एक म्हणजे मोठे फ्लोअर टू सीलिंग ग्लास डोअर्स. त्यामुळे घरात भरपूर नैसर्गिक प्रकाश येतो.
या घराची बाल्कनी ही श्वेताच्या आवडत्या जागांपैकी एक असल्याचं तिच्या पोस्टमधून जाणवतं. श्वेता तिवारीला वाचनाची आवड असल्याचंही तिच्या घरातून दिसून येतं. घरातील वेगवेगळ्या कोपऱ्यांमध्ये कोझी रीडिंग स्पेसेस तयार करण्यात आले आहेत. पुस्तक हातात घेऊन निवांत वेळ घालवण्यासाठी या जागा अगदी योग्य आहेत.
याशिवाय घरात श्वेताने जिंकलेल्या पुरस्कारांसाठी स्वतंत्र डिस्प्ले कॅबिनेटही आहे. त्यामुळे तिच्या दोन दशकांहून अधिक काळाच्या कारकिर्दीची झलक घराच्या सजावटीतही पहायला मिळते.
एकूणच श्वेता तिवारीचं घर आलिशान असून आरामदायी आणि पर्सनल टच असलेलं दिसतं. ग्लॅमरच्या दुनियेत राहूनही घराला तिने दिलेला साधा आणि प्रसन्न लूक चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहे.





Leave a Reply