
Raksha Bandhan 2026 : रक्षाबंधन म्हणजे भाऊ-बहिणीच्या अतूट नात्याचा उत्सव. येत्या 28 ऑगस्ट रोजी देशभरात रक्षाबंधन हा सण साजरा केला जाणार आहे. या सणानिमित्ताने बाजारात रंगेबेरंगी राख्यांची लगबग पाहायला मिळत आहे. अनेक राख्या आज बाजारात उपलब्ध असतात. रक्षाबंधन या सणाबद्दल सांगायचं झालं तर, हा सण फक्त भावाला राखी बांधण्यापर्यंत मर्यादित नाही. त्याचं फार मोठं महत्त्व आहे. रक्षाबंधन भावंडांमधील अथांग प्रेम, स्नेह, विश्वास आणि परस्पर आदराचा दिवस आहे. या विशेष दिवशी, बहीण आपल्या भावाच्या दीर्घायुष्यासाठी, आरोग्यासाठी, सुखासाठी आणि समृद्धीसाठी प्रार्थना करते आणि राखी बांधते. त्याच वेळी, भाऊ आपल्या बहिणीच्या पाठीशी उभे राहण्याची शपथ घेतो आणि तिच्या यशासाठी शुभेच्छा देतो.
यंदाच्या वर्षी रक्षाबंधन हा सण 28 ऑगस्ट रोजी साजरा केला जाईल. हा सण श्रावण महिन्यातील पौर्णिमेच्या शुभ दिवशी येतो. या निमित्ताने, राखी बांधताना तीन गाठी मारण्याच्या पारंपरिक समजुतीमागील रहस्य जाणून घेणं खूपच रंजक आहे.
राखीला तीन गाठी का बांधल्या जातात?
राखीचा धागा लहान असला तरी, तो भावंडांमधील प्रेम आणि एकमेकांच्या चांगल्या आयुष्याची इच्छा अशा भावनांचं प्रतीक आहे. ज्या कुटुंबांमध्ये रक्षाबंधनच्या दिवशी तीन गाठी बांधण्याची परंपरा आहे, तिथे प्रत्येक गाठीचा स्वतःचा असा एक अर्थ असतो….
पहिल्या गाठीचा अर्थ फार खास आहे. पहिली गाठ भावंडांमधील घट्ट बंध दर्शवते. पहिली गाठ म्हणजे बालपणीचा खोडकरपणा, गंमती, अधूनमधून होणारी भांडणं आणि मग त्यांना पुन्हा एकत्र आणणारे बंधुत्वाचे शाश्वत प्रेम दर्शवते.
दुसरी गाठ म्हणजे कुटुंबाची प्रगती आणि सदिच्छांशी जोडली जाते. बहीण आपल्या भावाच्या उत्तम आरोग्यासाठी, यशासाठी आणि जीवनातील शांतीसाठी प्रार्थना करते, तर भाऊ आपल्या बहिणीच्या सुखासाठी, यशासाठी आणि सन्मानासाठी शुभेच्छा देतो.
तिसरी गाठ विश्वास, सुरक्षितता आणि दीर्घायुष्यासाठी असते. तिसरी गाठ ही विश्वास, सुरक्षितता आणि दीर्घायुष्याचे प्रतीक आहे. ती केवळ भावाकडून मिळणाऱ्या संरक्षणाच्या वचनाचंच नव्हे, तर दोघांमधील विश्वास आणि परस्पर सहकार्य आयुष्यभर टिकेल याचंही प्रतीक आहे. याच तीन कारणांमुळे भावाच्या हातात राखी बांधताना तीन गाठी बांधण्याची परंपरा आहे.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही…)
Leave a Reply