
रितेश देशमुखचा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित ‘राजा शिवाजी’ हा चित्रपट 1 मे रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. त्यापूर्वी या चित्रपटाच्या ॲडव्हान्स बुकिंगला सुरुवात झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार 30 एप्रिल रोजी सकाळी 8 वाजेपर्यंत या चित्रपटाचे जवळपास 60 हजारांहून अधिक तिकिटं विकली गेली आहेत. महाराष्ट्र दिनी हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होणार असून लाँग वीकेंडचाही त्याला फायदा मिळू शकतो. छत्रपती शिवाजी महाराजांवर आजवर अनेक चित्रपट बनवण्यात आले, परंतु रितेशचा ‘राजा शिवाजी’ अत्यंत भव्यदिव्य आहे. टीझर आणि ट्रेलर पाहिल्यानंतर अनेकांना या चित्रपटाविषयी प्रचंड उत्सुकता निर्माण झाली. त्यामुळेच ॲडव्हान्स बुकिंगचा आकडा चांगलाच वाढल्याचं पहायला मिळतंय.
‘सॅकनिल्क’ने दिलेल्या रिपोर्टनुसार, ‘राजा शिवाजी’ने ॲडव्हान्स बुकिंगमध्ये दीड कोटी रुपयांपेक्षा अधिक कमाई केली आहे. रितेश देशमुखच्या ‘वेड’ या चित्रपटापेक्षा हा जवळपास तीन पटींनी अधिक आकडा आहे. परंतु नागराज मंजुळेंच्या ‘सैराट’ या चित्रपटाने ॲडव्हान्स बुकिंगमध्येच तीन कोटी रुपयांपेक्षा अधिक कमाई केली होती. हा मराठी चित्रपटसृष्टीतील ऑलटाइम ब्लॉकबस्टर चित्रपट मानला जातो. आता याचा विक्रम ‘राजा शिवाजी’ मोडू शकेल का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
‘राजा शिवाजी’च्या निमित्ताने हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज कलाकारांची भव्य फळी एकत्र आली आहे. संजय दत्त, अभिषेक बच्चन, विद्या बालन, महेश मांजरेकर, सचिन खेडेकर, बोमन इराणी, भाग्यश्री, फरदीन खान, जितेंद्र जोशी, अमोल गुप्ते आणि जिनिलिया देशमुख यांसारख्या कलाकारांच्या प्रभावी उपस्थितीमुळे चित्रपटाची भव्यता अधिक वाढली आहे. या संपूर्ण टीमचं नेतृत्व रितेश देशमुखने केलं असून त्याचं लेखन, दिग्दर्शन, निर्मिती आणि मुख्य भूमिका अशा सर्वच जबाबदाऱ्या त्याने समर्थपणे सांभाळल्या आहेत. हा चित्रपट ज्योती देशपांडे आणि जिनिलिया देशमुख यांनी निर्मित केला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं जीवन, संघर्ष, नेतृत्व आणि स्वराज्य स्थापनेचा प्रेरणादायी प्रवास यावर आधारित हा ऐतिहासिक चित्रपट आहे.
‘राजा शिवाजी’ हा चित्रपट 1 मे 2026 रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये मराठी आणि हिंदी भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. भव्य दृश्यरचना, दमदार कथा, ऐतिहासिक भावविश्व आणि प्रेरणादायी मांडणीमुळे हा चित्रपट प्रेक्षकांसाठी एक संस्मरणीय अनुभव ठरणार असल्याची चर्चा सध्या सर्वत्र सुरू आहे.
Leave a Reply