
अभिनेता रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' या चित्रपटाविषयी प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. नुकतंच या चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाने प्रमाणपत्र दिलं आहे. हा चित्रपट 3 तास 15 मिनिटं आणि 5 सेकंदांचा आहे. सेन्सॉर बोर्डाने या चित्रपटात दोन महत्त्वपूर्ण बदल सुचवले आहेत. त्याचसोबत 'राजा शिवाजी'ला U/A 16+ सर्टिफिकेट दिलं आहे.
'बॉलिवूड हंगामा'ने दिलेल्या वृत्तानुसार, 'राजा शिवाजी' या चित्रपटाला 24 एप्रिल रोजी प्रमाणपत्र देण्यात आलं. सेन्सॉर बोर्डाच्या तपासणी समितीने चित्रपट निर्मात्यांना 'डिस्क्लेमर' अधिक स्पष्ट शब्दांत पुन्हा मांडण्याचे आणि त्याचसोबत व्हॉइस ओव्हर समाविष्ट करण्याचे निर्देश दिले आहेत.
'राजा शिवाजी' हेच शीर्षक का निवडलं, याविषयी स्पष्टीकरण देण्यासही सेन्सॉर बोर्डाने सांगितलं आहे. त्याचप्रमाणे चित्रपटात वापरलेल्या सर्व ऐतिहासिक संदर्भांची पुष्टी करणारी कागदपत्रेही सादर करण्यास सांगण्यात आलं आहे. याव्यतिरिक्त बोर्डाने चित्रपटाच्या पटकथेची एक प्रत मागितली आहे, जी चित्रपटातील डायलॉग आणि गाण्यांशी तंतोतंत जुळणारी असेल.
सेन्सॉर बोर्डाने चित्रपटाच्या टीमला सर्व प्रमुख घटनांशी संबंधित विशिष्ट तारखा नमूद करण्याचे निर्देश दिले आहेत. ऐतिहासिक घटनांना संदर्भ देण्यासाठी माहितीचे कार्ड्स समाविष्ट करण्यासही सांगण्यात आलं आहे. त्याचसोबत चित्रपटात दोन विशिष्ट बदल करण्याचे आदेश दिले आहेत.
सेन्सॉर बोर्डाने चित्रपटातील एका लहान मुलाचा गळा चिरल्याचा सीन काढून टाकण्याचे निर्देश दिले आहेत. त्याऐवजी योग्य पर्यायी दृश्ये वापरण्यास सांगण्यात आलं आहे. त्याचप्रमाणे काही म्युट दृश्यांमध्ये आवाज जोडण्यास सांगितलं आहे.
'राजा शिवाजी' या चित्रपटाचं दिग्दर्शन रितेश देशमुखनेच केलं असून त्यानेच यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली आहे. त्याच्यासोबत जिनिलिया देशमुख, अभिषेक बच्चन, संजय दत्त, विद्या बालन, फरदीन खान, बोमन इराणी, महेश मांजरेकर, सचिन खेडेकर, सिद्धार्थ जाधव यांसारखी कलाकारांची मोठी फौज त्यात आहे.






Leave a Reply