
मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री प्राजक्ता माळी सध्या एका महागड्या प्रॉपर्टी डीलमुळे चर्चेत आली आहे. प्राजक्ताने मुंबईतील गोरेगाव परिसरातील Oberoi Exquisite या आलिशान प्रोजेक्टमध्ये तब्बल 6.42 कोटी रुपयांचा फ्लॅट खरेदी केला आहे. या व्यवहारातील सर्वाधिक लक्ष वेधून घेणारी गोष्ट म्हणजे या घरासाठी तिने घेतलेलं मोठं होम लोन.
प्रॉपर्टी रजिस्ट्रेशनच्या कागदपत्रांनुसार, प्राजक्ताने घेतलेला हा फ्लॅट टॉवर सीच्या 28 व्या मजल्यावर आहे. त्याचा कार्पेट एरिया सुमारे 996 चौरस फूट आहे. फ्लॅटसोबतच 240 चौरस फुटांची टँडम कार पार्किंगची जागाही मिळते. 12 ऑगस्ट 2026 रोजी प्राजक्ताने या व्यवहाराची अधिकृत नोंद केली.
या घरासाठी प्राजक्ताने इंडियन बँकेकडून 5.78 कोटी रुपयांचं होम लोन घेतल्याचं कागदपत्रांवरून समोर आलं आहे. म्हणजेच घराच्या एकूण खरेदी किमतीच्या जवळपास 90 टक्के रक्कम कर्जातून उभी करण्यात आली आहे. उर्वरित रक्कम प्राजक्ताला स्वत:च्या निधीतून द्यावी लागली. त्याशिवाय स्टॅम्प ड्युटी आणि इतर व्यवहार खर्चही आहेत.
या व्यवहारासाठी प्राजक्ताने सुमारे 32.12 लाख रुपये स्टँप ड्युती तर 30 हजार रुपये रजिस्ट्रेशन शुल्क भरल्याची माहिती आहे. त्यामुळे केवळ फ्लॅटची किंमतच नाही, तर त्यासोबतचा अतिरिक्त खर्चही मोठा आहे. विशेष म्हणजे प्राजक्ताने यापूर्वीही प्रॉपर्टीमध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. 2023 मध्ये तिने कर्जत इथं फार्महाऊस घेतलं होतं. त्यावेळी तिने स्वत: सांगितलं होतं की फार्महाऊससाठी मोठं कर्ज घेतलं होतं.
फार्महाऊससाठी आईने एफडी मोडल्या आणि कुटुंबातील सदस्यांनी दागिने गहाण ठेवल्याचाही प्राजक्ताने खुलासा केला होता. त्यामुळे आता 6.42 कोटींच्या मुंबईतील घराची खरेदी ही प्राजक्ताच्या वाढत्या आर्थिक प्रवासातील आणखी एक महत्त्वाची पायरी मानली जात आहे.




Leave a Reply