
मुंबईत कालपासून सुरू झालेल्या पावसाने आज सकाळी जोर धरला आहे. शहरातील अनेक सखल भागांमध्ये पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. विशेषतः कुर्ला, सायन आणि आसपासच्या परिसरात रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळे वाहतुकीवर गंभीर परिणाम झाला आहे.
कुर्ला ते चुनाभट्टी मार्गावर वाहतूक कोंडीची परिस्थिती निर्माण झाली असून वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. सायन आणि कुर्ला परिसरातील प्रमुख रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहनांचा वेग मंदावला असून मुंबईकडे जाणाऱ्या वाहतुकीवर मोठा ताण निर्माण झाला आहे.
सकाळची कार्यालयीन वेळ असल्याने हजारो नोकरदार नागरिकांना या वाहतूक कोंडीचा फटका बसत आहे. कामावर जाण्यासाठी घराबाहेर पडलेल्या नागरिकांना रस्त्यावरच अडकून पडावे लागत असून प्रवासाचा कालावधीही वाढला आहे.
दरम्यान, मुसळधार पावसाचा परिणाम रेल्वे वाहतुकीवरही दिसून येत आहे. काही मार्गांवरील लोकल गाड्या उशिराने धावत असल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. एकीकडे रस्त्यांवरील वाहतूक कोंडी आणि दुसरीकडे रेल्वे सेवेतील विलंब यामुळे मुंबईकरांना दुहेरी समस्येचा सामना करावा लागत आहे.
हवामान विभागाने पुढील काही तासांत पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता व्यक्त केली असून नागरिकांनी अत्यावश्यक कामांशिवाय घराबाहेर पडताना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
Leave a Reply