
राज्यात कांद्याचे भाव वाढल्याने सामान्यांच्या घराचं बजेट बिघडलं आहे. मुंबईसहीत अनेक मंडयांमध्ये कांद्याचे भाव वाढल्याने ग्राहकांच्या खिशाला कात्री पडली आहे. कांद्याचे भाव वाढल्याने गृहिणींचं बजेट कोलमडलं आहे. शिवाय होलसेल व्यापाऱ्यांवरही या दरवाढीचा परिणाम होणार आहे. त्यामुळे हे व्यापारी चिंतेत आहेत. कांद्याचे भाव वाढल्याने पूर्वीच्या तुलनेत आता ग्राहक कमी प्रमाणात कांदा खरेदी करत आहेत, असं या व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे.
मुंबईतील मंडयांमध्ये कांद्यांचे भाव वाढल्याने व्यापारी आणि ग्राहकांमध्ये नाराजी पसरली आहे. बाजारात कांद्याची आवक कमी झाली आहे. त्याचा परिणाम किमतीवर पडत आहे. तसेच कांदा महागल्याने लोक गरजेपुरताच कांदा खरेदी करत आहेत. त्यामुळे आर्थिक संकट उभं राहिलं आहे, असं व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे.
कांदा व्यापारावर किती परिणाम
कांद्याचे भाव वाढल्याने त्याचा विक्रीवरही परिणाम झाला आहे. जे ग्राहक मोठ्या प्रमाणात कांदा खरेदी करायचे, ते आता कमी प्रमाणात खरेदी करत आहेत. त्यामुळे कांदा व्यापारावर 20 ते 30 टक्के परिणाम झाला आहे, असं व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे.
कांद्याचे भाव वाढले आहेत. बाजारात कांद्याची आवकही कमी झाली आहे. सरकारने एक दिवस बाजारात येऊन व्यापार करून पाहावा. सामान्य लोकांना महागाईचा फटका बसला आहे. घरात बसलेल्यांना महागाईची झळ पोहोचत नाही, असा संताप या व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
लाडक्या बहिणींना 2 हजार, आमच्याकडून 5 हजार घेतात
बाजारात कांदा खरेदी करण्यासाठी आलेल्या ग्राहकांनीही नाराजी व्यक्त केली आहे. एका महिलेने थेट सरकारवरच टीका केली. लाडक्या बहिणीला दोन हजार रुपये दिले जातात. अन् आमच्याकडूनच 5 हजार रुपये उकळले जात आहेत, असं या महिलेने म्हटलं आहे. सरकारी योजनांमुळेच दैनंदिन जीवनातीली वस्तूंचे भाव वाढत आहेत. त्यामुळे कुटुंबाचा बजेट सांभाळणं मुश्किल होत असल्याचं लोकांचं म्हणणं आहे.
कांदा घेऊन जाणारी गाडी रद्द
दरम्यान, नाशिकच्या निफाडमधून गुवाहाटीला कांदा भारून मालगाडी पाठवण्यात येणार होती. पण ही मालगाडी ऐनवेळी रद्द करण्यात आली आहे. रेल्वे रॅक रद्द करण्याचे कारण देण्यात आलेलं नाही. तर लासलगाव येथून दिल्ली येथे पाठवण्यात येणारा रेल्वे रॅक दाखल झाला आहे. मात्र एनसीसीएफने खरेदी केलेला कांदा अद्यापही लोडिंगसाठी न आल्याने याबाबतही प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. दुसरीकडे लासलगावहून दिल्लीला कांदा पाठवण्यास ठाकरे गटाने विरोध केला आहे.
Leave a Reply