
साखर, लसूण, कांदा यांच्या किंमती वाढत असताना आता नागरिकांना दूध दरवाढीचा फटका सहन करावा लागणार आहे. मुंबई दुग्ध उत्पादक संघाने दुधाच्या घाऊक दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. याचा थेट परिणाम मुंबईकरांवर होणार आहे. मुंबई दुग्ध उत्पादक संघाने दरवाढ जाहीर केली आहे. सध्या मुंबईत दुधाचा घाऊक दर प्रति लिटर 93 रुपये आहे. दरवाढीनंतर आता 1 सप्टेंबरपासून 102 रुपये प्रति लिटर नवीन दर असेल. 1 सप्टेंबर 2026 ते 28 फेब्रुवारी 2027 साठी ही नवीन दरवाढ असेल. मुंबईत पेट्रोल आणि दुधाचे दर आता जवळपास एकसारखेच झाले आहेत. मुंबईत प्रति लिटर पेट्रोलचा दर 111.21 रुपये आहे. आता प्रतिलिटर दूधाची किंमत 102 रुपये झाली आहे.
मुंबईत महागाई किती आहे? सर्वसामान्यांच्या खिशावर किती भार आहे? हे यातून दिसतय. गरीबाने या महानगरात जगायचं कसं असा प्रश्न या निमित्ताने विचारला जातोय. म्हशीच्या दूध दरात ही प्रति लिटर 9 रुपये वाढ झाली आहे. दाणा, तूरचुणी, चणाचुणी, चारा आणि पेंड या पशू खाद्याच्या किंमतीत जवळपास 25 टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे. जनावरांच्या वाढत्या किंमती आणि पशुखाद्याच्या दरात झालेली वाढ ही या दरवाढीमागची प्रमुख कारणे आहेत. यामुळे दुधाचे दर वाढवण्याचा निर्णय घ्यावा लागला, असं दुग्ध उत्पादक संघाकडून सांगण्यात आलं.
कोणावर या दरवाढीचा परिणाम होणार नाही?
सुट्या म्हशीच्या दूध दरात ही वाढ झाली आहे. पॅकेटबंद दूध खरेदी करणाऱ्या ग्राहकांवर या भाववाढीचा परिणाम होणार नाही. पण अमूल, गोकुळ या कंपन्यांच्या पाकिटबंद दूधाचे दर कमी नाहीत. या खासगी दूध कंपन्या वेळोवेळी आपल्या दुधाचे दर वाढवतच असतात. त्यामुळे साखर, लसूण नंतर सर्वसामान्यांना आता दूध दरवाढीचा फटका सहन करावा लागणार आहे.
Mumbai, Maharashtra: Bombay Milk Producers Association raises the price of wholesale milk rate from Rs 93 per litre to Rs 102 per litre. This new rate will be effective from September 1, 2026, to February 28, 2027.
— ANI (@ANI) August 28, 2026
सप्टेंबर महिन्यापासून सणांचा हंगाम
आखातातील युद्धामुळे आधीच पेट्रोल-डिझेलचे दर वाढवले. त्यामुळे महागाई वाढली. आता सणासुदीच्या दिवसात साखर, दुधाचे दर वाढले आहेत. सप्टेंबर महिन्यापासून सणांचा हंगाम सुरु होतोय. गणेशोत्सव, नवरात्रौत्सव, दिवाळी हे मोठे सण आहेत. त्यावेळी दूध, साखर यांची मोठी मागणी असते. आता याच पदार्थांचे दर गगनाला भिडले आहेत.
Leave a Reply