
भारत आणि श्रीलंका यांच्यात पहिला कसोटी सामना गॉल आंतरराष्ट्रीय मैदानात सुरू आहे. या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी स्वीकारली आणि पहिल्या दिवसावर अधिराज्य गाजवलं. पण दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरू झाला आणि भारताचं नशिब फुटकं निघालं. लंच ब्रेकपर्यंत एकही चेंडू टाकला गेला नाही. पण त्यानंतर सामना सुरू झाला आणि भारताच्या धावगतीला ब्रेक लागला. फिरकीच्या जोरावर भारताच्या धडाधड विकेट पडल्या. त्यामुळे पावसानंतर खेळपट्टी फिरकीला मदत करत असल्याचं स्पष्ट दिसत आहे. कारण सेट झालेल्या फलंदाजांनाही श्रीलंकन फिरकीचा सामना करणं कठीण गेलं. भारताच्या धडाधड चार विकेट पडल्या. या चारही विकेट फिरकीच्या जोरावर श्रीलंकेला मिळाल्या. त्यामुळे खेळपट्टी पूर्णपणे फिरकीला मदत करत असल्याचं दिसत आहे. फिरकीचा सामना करताना अडचण येत असल्याने भारताच्या धावगतीलाही ब्रेक बसला आहे. खरं तर दुसऱ्या दिवशी 500 पार धावा अपेक्षित होत्या, पण पावसामुळे आणि फिरकीच्या जादूमुळे गणित चुकलं असंच म्हणावं लागेल.
दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरू झाला तेव्हा काय झालं?
पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताच्या 288 धावांवर दोन विकेट होत्या. तर देवदत्त पडिक्कल नाबाद 131 धावांवर होता, तर ऋषभ पंत नाबाद 27 धावांवर खेळत होता. लंच ब्रेकनंतर पाऊस निवळला आणि सामन्याला सुरूवात झाली. त्यानंतर पहिली विकेट ऋषभ पंतच्या रुपाने मिळाली. 39 धावांवर असताना केशारा नुवांथाच्या गोलंदाजीवर बाद झाला. रिटायर्ड हर्ट झालेला केएल राहुल पुन्हा फलंदाजीला आला आणि 82 धावांवर केशाराने त्याला तंबूत पाठवलं. त्यानंतर देवदत्त पडिक्कल 167 धावांवर असताना प्रभात जयसूर्याचा शिकार ठरला.
शेपटाचा फलंदाजांकडून अपेक्षा वाढली
खेळपट्टीवर जम बसवलेले फलंदाज झटपट बाद झाल्यानंतर टीम इंडिया अडचणीत आली. ध्रुव जुरेल आणि रवींद्र जडेजा यांच्यावर डाव सावरण्याची वेळ आली. पण 13 धावांवर असताना रवींद्र जडेजा नुवांथाचा बळी ठरला. त्यामुळे खेळपट्टी पूर्णपणे फिरकीच्या बाजूने वळली असल्याचं दिसत आहे. आता सावधपणे खेळण्याची जबाबदारी भारतीय फलंदाजांवर आहे. तर श्रीलंकेचं या सामन्यात कमबॅक झालं आहे. इतकंच काय तर भारतीय फिरकीपटूंची जबाबदारी वाढली आहे.
Leave a Reply